पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वादात पाण्याच्या प्रश्नावरून पुणेकरांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप शनिवारी कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने केला. जलसंपदा प्राधीकरणाने पुण्याला लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे पाणी देण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे पाणी निम्मे कमी होणार आहे. याचा निषेध करण्यासाठी कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने लाक्षणिक उपोषण केले. आमदार अनंतराव गाडगील, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, अभय छाजेड, कमल व्यवहारे, डॉ. सतीश देसाई व दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मंडई येथील आंदोलनात सहभागी झाले होते. नगरसेवक संजय बालगुडे यांनी संयोजन केले होते.
पुण्यासाठी पाण्याचा कोटा मंजूर झाल्यावर तो कमी करण्याचा जलसंपदा प्राधिकरणाला अधिकारच नाही. मात्र, तरीही पुणेकरांना पाण्याबाबत वेठीस धरले जात आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या वादात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पुण्याचे पाणी कमी केले जात आहे, असा आरोप या वेळी केला. ‘ही पाणीकपात नाही, पुणेकरांचा घात आहे’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.पालिकेत सोमवारीहंडा आंदोलन४कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी महापालिकेत महिलांचे हंडा आंदोलन करण्यात येणार आहे. पाण्याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती संजय बालगुडे यांनी दिली.पुण्यात पाण्याची समस्या निर्माण होण्यामागे नियोजनाचा अभाव हीच समस्या असल्याचे एक नगररचना तज्ज्ञ म्हणून माझे मत आहे. १९८७ मध्ये विकास आराखडा तयार करतानाच भविष्यातील लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याचे नियोजन करायला हवे होते. तसे ते केले गेले नाही. एखाद्या कामाकडे गंभीरपणे पाहिले नाही की पुढे अन्य गोष्टींमध्येही समस्या निर्माण होत जातात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. नियोजन करताना याच गोष्टींचा विचार करावा लागतो. जलसंपदा बरोबर आता नव्याने करार करताना महापालिकेने या सर्व गोष्टींचे प्रभावी सादरीकरण केले पाहिजे. त्यात भविष्यात पुणे आणखी वाढणार आहे व येणारे लोकही वाढणार आहेत. ते लक्षात घ्यावे. - रा. ना. गोहाड, ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ