पत्राद्वारे निवेदन : मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना महामारीच्या काळात संकटाचा सामना करण्यासाठी एक वर्षापूर्वी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली. टास्क फोर्सच्या माध्यमातून रोगाचे निदान आणि उपचारांबाबत सक्षमतेने आणि तत्परतेने पावले उचलत आहेत. मात्र, सध्याच्या टास्क फोर्समध्ये केवळ वैद्यकतज्ज्ञांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त टास्क फोर्स स्थापन करून त्यामध्ये जैवशास्त्रज्ञ, साथरोगतज्ज्ञ, विषाणूतज्ज्ञ, समाजसेवक यांचा समावेश करावा अशी मागणी मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे की, सध्या नागरिकांमध्ये कोरोना उपचारपद्धती, लसीकरण याबाबत अजूनही गोंधळाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरील अर्धवट माहितीने नागरिक हैराण झाले आहेत. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला, जुने आजार असलेले नागरिक यांनी लस घ्यावी की नाही, कोरोनामुक्त झालेल्यांनी कधी लस घ्यावी, आयुर्वेदिक औषधांचा वापर अशा अनेक शंका सामान्यांमध्ये आहेत. विश्वसनीय आणि अधिकृत स्रोतांकडून माहिती अभियान हा या समस्येचे निराकरण करण्याचा एकमात्र प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे अतिरिक्त टास्क फोर्सची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
नवीन टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील डॉक्टरांना एकत्र आणले पाहिजे. त्याशिवाय विविध आजारांवरील वैद्यकीय तज्ज्ञांची समिती तयार करणे गरजेचे आहे. नागरिकांना लस, आणि औषधोपचारांबाबत अधिकृत माहिती देणारी समिती तयार केली पाहिजे. टास्क फोर्सच्या तयारीसाठी सोसायटीच्या लोकांना सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी पत्रातून सांगितले आहे.