पुणे : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी जातीयवादाची पेरणी करून नागरिकांना आपापसात लढविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळेच पुण्यासह राज्याचा विकास खुंटला आहे आणि त्याचा विचका झाला आहे. त्यामुळेच मनसेला एकहाती सत्ता देऊन राज्याचा विकास घडवावा,'' असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मला खुर्चीचा सोस नाही तसेच मुख्यमंत्री माझ्या घरातील करावा, हा विचारदेखील नाही.' असे स्पष्टीकरणही राज ठाकरे यांनी दिले.हडपसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. नागरिकांना काय हवे, याचा विचार न करता आपल्याला काय हवे, हेच लक्षात ठेवून हडपसरमधील राजकारण्यांनी येथील विकास रोखला आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. हडपसर कोंढवा या गावांमधील जुन्या लोकांना आजही जुने हडपसर जुने कोंढवा हवेसे वाटते. त्यामुळे महापालिकेत ही गावे समाविष्ट का झाली, असा सवाल केला जात आहे. वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. येथील राजकारण्यांनी केवळ जाती - जातींमध्ये द्वेष पसरविला आहे. चांगले दिवस आणणारे वातावरण नक्कीच नाही. राज्यालाही हे वातावरण घातक आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.या परिसरात शाळांमध्ये सामान्यांना प्रवेश नाहीत, रुग्णालये नाहीत, महिलांना सुरक्षित वातावरण नाही, मुलींवर अत्याचार होत आहेत. मुंबईचा विचका होण्यास काही काळ गेला. मात्र, पुण्याचा विचका होण्यास वेळ लागला नाही. शहरांना आकार देताना लोकांचा विचार करणे गरजेचे आहे. सध्या विकासाच्या नावाखाली नव्या कंत्राटदारांना कामे देऊन त्यांच्याकडून केवळ टक्क्यांची वसुली केली जात असल्याचा घणाघात ठाकरे यांनी यावेळी केला.सन २०१४मध्ये मनसेने राज्याचा विकास आराखडा तयार केला होता. यापूर्वी कोणत्याही पक्षाने एखाद्या राज्याचा विकास आराखडा तयार केला नव्हता. त्यामुळे माझ्या मनातील महाराष्ट्र घडवण्यासाठी एकहाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवछत्रपती यांनी दिलेले वैभव परत मिळवण्यासाठी मनसेला निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Raj Thackeray : "मुख्यमंत्री माझ्या घरातील करावा, हा विचार नाही"; राज ठाकरे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 3:19 PM