पुणे : दिवाळीनंतरही पुण्याचे पाणी दररोज १३५० दशलक्ष लिटरच राहील, हे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन वाऱ्यावरच विरले आहे. पाणीकपात करू नये, याबाबत कोणताही लेखी किंवा तोंडी आदेश जलसंपदा विभागाला अद्यपी मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी पुण्याच्या पाण्यात कपात करण्याची तयारी सुरू केली आहे. ११५० दशलक्ष लिटर दररोज याप्रमाणेच पुण्याला खडकवासला धरणातून पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे.
पुणे शहराची पाण्याची दररोजची गरज १५०० ते १६०० दशलक्ष लिटर इतकी आहे. हे पाणी मंजूर कोट्यापेक्षा जास्त होत, असा जलसंपदाचा आरोप आहे. त्यामुळेच त्यांनी मध्यंतरी थेट खडकवासला धरणावरील महापालिकेच्या पंप हाऊसमध्ये पोलीस बंदोबस्तासह जाऊन पंप बंद केले होते. त्यानंतर शहराला १३५० दशलक्ष लिटर पाणी देण्यात येऊ लागले आहे. त्यातही कपात करून ते ११५० दशलक्ष लिटर करावे, असा जलसंपदाचा आग्रह आहे. तशी तंबी देणारे लेखी पत्रच त्यांनी महापालिकेला दिले आहे. त्यातच दिवाळीनंतरही मंजूर कोटा आहे त्याप्रमाणे ११५० दशलक्ष लिटर पाणीच घ्यावे, त्यापेक्षा जास्त पाणी घेतल तर पुन्हा पंप बंद करण्याची कारवाई करणार, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
आम्ही पत्र दिले आहे त्याप्रमाणे महापालिकेला यापुढे धरणातून दररोज ११५० दशलक्ष लिटर इतकेच पाणी देण्यात येणार आहे, अशीही माहिती दिली. लोकसंख्या व राष्ट्रीय जल प्राधिकरणाच्या माणशी १३५ लिटरप्रमाणे त्यापेक्षा कितीतरी जास्त हे पाणी आहे, असे जलसंपदाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना होणारा पाणी पुरवठा योग्यच आहे. गळती होत असेल तर ती कशी थांबवायची हा महापालिकेचा प्रश्न आहे, त्यांनी तो त्वरेने सोडवावा, नागरिकांना पाणी काटकसरीने वापरायचे आवाहन करावे, असे जलसंपदातील काही अधिकाºयांनी सांगितले. जलसंपदाने दररोज ११५० दशलक्ष लिटर पाणी देण्यास सुरुवात केली तर महापालिकेची भंबेरी उडणार आहे. आधीच पाण्यात कपात झाल्यामुळे त्यांनी रोज सलग ५ तास पण एकवेळ याप्रमाणे नवे वेळापत्रक तयार करून उपलब्ध पाणी व लोकसंख्या यांचे मेळ घातला आहे. अजूनही शहराच्या काही भागात विशेषत: उपनगरांमध्ये पिण्याचे पाणी नियमितपणे मिळत नाही. त्यामुळे ११५० पाणी मिळू लागले तर ते संपूर्ण शहराला पुरवायचे कसा, असा प्रश्न महापालिकेसमोर निर्माण झाला आहे.महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्वच पदाधिकाºयांनी दिवाळीपूर्वी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौºयात त्यांना दिवाळीनंतरही पुणे शहराला १३५० दशलक्ष लिटरच पाणी ठेवावे, अशी विनंती केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तोंडी आश्वासन तर दिलेच होते, शिवाय जलसंपदा सचिवांबरोबर बोलून त्यांना तसे आदेश त्वरित जारी करण्यास सांगितले आहे, असे महापौरांनी सांगितले होते. मात्र पंधरापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. दिवाळी संपूनही चार दिवस झाले. तरीही जलसंपदा खात्याच्या पुणे विभागाला असे कोणतेही लेखी किंवा तोंडी आदेश मिळालेले नाहीत. तेथील वरिष्ठ अधिकाºयांनीच तसे स्पष्ट केले आहे.पुणेकर जास्त पाणी वापरतात म्हणून शेतीला पाणी कमी मिळते, अशी एक तक्रार जºहाड व अन्य काही शेतकºयांनी जलसंपदाकडे केली आहे. त्याची सध्या सुनावणी सुरू आहे.मुंबईत नुकत्याच झालेल्यायासंबंधीच्या बैठकीत जलसंपदाने महापालिकेला त्यांच्या वाढीव लोकसंख्या, फ्लोटिंग लोकसंख्या याविषयीची अधिकृत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी १३ डिसेंबरला आहे.