पुणे : वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त मतं मिळावीत आणि काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी व्हावी यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री शक्य असेल त्या मार्गाने वंचितला बळ देण्याचं काम करत असल्याचा आराेप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
पुण्यातील बारामती हाॅस्टेल येथे राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, फाैजिया खान, रुपाली चाकणकर आदी उपस्थित हाेते. या बैठकीनंतर आयाेजित पत्रकार परिषदेत पाटील बाेलत हाेते.
वंचितसाेबत आम्ही काेणतीही बाेलणी करत नसून काॅंग्रेस त्यांच्याशी बाेलणी करत असल्याचेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. हर्षवर्धन पाटील यांच्या आराेपांवर बाेलताना ते म्हणाले, इंदापूरच्या जागेबाबात आज कुठलीही चर्चा झाली नाही. हा दाेन पक्षांमधील प्रश्न आहे. त्यावर आज चर्चा झाली नाही. काॅंग्रेसाेबत इंदापूरच्या जागेबाबत आम्ही चर्चा केली हाेती. त्या जागेबाबतचा निर्णय दाेन्ही पक्षांमधील वरीष्ठ करतील असे ठरले हाेते. त्या आधीच काही लाेकांनी त्याबाबत चिंताजनक वक्तव्य केली आहेत. ती मैत्रीपूर्ण संबंधांना छेद देणारी आहेत. तरी देखील काॅंग्रेसशी त्याबाबत आम्ही चर्चा करु.
पक्ष साेडलेल्या जागांवर पर्यायी उमेदवारांचा आम्ही विचार केला आहे. त्याजागी चांगले आणि पक्षाचे बळ वाढविणाऱ्या उमेदवारांचा आम्ही विचार केला आहे. ज्या ठिकाणी आमचे एकच दावेदार आहेत, ते उमेदवार कामाला लागले आहेत.
उद्यनराजे राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्यांनी पक्ष साेडण्याची भाषा अद्याप केलेली नाही. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा संबंध येत नाही. असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
पक्षाकडे 813 अर्ज प्राप्त झाले. त्या सर्व अर्जांचा आम्ही विचार केला. आलेल्या अर्जांबाबत सर्वांची मतं विचारत घेतली. काॅंग्रेसशी चर्चा पूर्ण न झाल्याने कुठल्याही जागेचा अंतिम निर्णय आम्ही अद्याप घेतलेला नाही. जागावाटप झाल्यानंतर हे निर्णय आम्ही करु. जागावाटपांबाबत आम्ही मेरीटवर चर्चा करत आहाेत. बरीचशी चर्चा झाली आहे. 220 जागांपर्यंत आम्ही निर्णय केले आहेत. परंतु अंतिम निर्णय घेण्याआधी काही अदल बदल करावी म्हणून आणखी एक बैठक घेण्याचे ठरले आहे. काॅंग्रेसची सुद्धा काल दिल्लीत बैठक झाली आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये आम्ही पुढच्या चर्चेसाठी एकत्र बैठक घेणार आहाेत. असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.