स्टार १०७९
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातल्या देखील काही महत्वाच्या रस्त्यांची कामे रखडली आहेत. यात पुणे-नाशिक महामार्ग, चांदणी चौक उड्डाणपूल, पालखी मार्ग, पुणे-कोल्हापूर सर्व्हिस रोड अशा काही रस्त्यांची कामे केल्या अनेक वर्षांपासून रखडली आहेत. परंतु, ही कामे राजकीय हस्तक्षेपामुळे कमी आणि प्रशासकीय कारणांमुळे जास्त रखडली आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेनेची ‘दबंगशाही’ अडचणीची ठरत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही प्रतिक्रिया देत कामे थांबणार नसल्याचे आश्वासन दिले. पुण्यातील कामांचीही दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा पुणेकरांकडून व्यक्त होती आहे. दुसरीकडे गडकरी यांच्या विधानामुळे राज्यभरातील रस्त्यांची कामे नक्की कशामुळे रखडतात, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यात देखील राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा मार्ग, पालखी मार्गांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात एखादा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी राजकारण होऊ शकते, परंतु काम सुरू झाल्यानंतर पक्षीय राजकारण अथवा पैशाच्या मागणीसाठी प्रकल्पाचे काम थांबविण्यात आल्याचे उदाहरण नसल्याचे बांधकाम विभागातील अधिकृत व वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
चौकट
पुणे-नाशिक महामार्ग
पुणे-नाशिक महामार्गचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे काम मंजूर झाल्यानंतर सुरुवातील लोकांनी जमिनी देण्यास नापसंती दर्शवल्याने विरोध झाला. त्यानंतर या महामार्गावर अनेक महत्वाच्या गावांमधून ‘बायपास’ जात असल्याने त्यास विरोध झाला. त्यानंतर रस्त्याचे काम करणारा ठेकेदारच पळून गेल्याने काम रखडले होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हे काम पुन्हा सुरू झाले आहे.
चौकट
पुणे-कोल्हापूर रस्ता
पुणे-कोल्हापूर रस्त्यावरील खेड-शिवापूर येथील टोल नाक्याचा प्रश्न, रस्त्यावरील वाहतूककोंडी, ‘सर्व्हिस’ रस्त्यांची कामे अनेक महिन्यांपासून रखडलेला विषय आहे. ठेकेदार कंपनी आणि जिल्हा प्रशासन यात हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियमित बैठका होतात, पण त्यास गती आलेली नाही.
चौकट
चांदणी चौक उड्डाणपूल
पुण्यातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुंबई-बंगळुरू महामार्गावर चांदणी चौक येथे मोठा उड्डाणपूल बांधकाम होत आहे. राष्ट्रीय महामार्गमार्फत हे काम करण्यात येत आहे. दीर्घकाळ हे काम रखडल्याने स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना येथे भेट द्यावी लागली होती. भूसंपादनाच्या अडचणीमुळे हे काम रखडले होते. गडकरी यांच्या भेटीनंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या तीन महिन्यांत यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला.
चौकट
पुण्यातले वातावरण वेगळे
“पुणे जिल्ह्यात सतत अनेक मोठे प्रकल्प, रस्त्यांची कामे सुरू असतात. पण येथे केवळ राजकारण म्हणून किंवा पैशांसाठी विकास कामं बंद पाडण्याची प्रथा नाही. अनेक वेळा रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी सर्व एकत्र येतात.”
-इंजि. दिलीप मेदगे, पुणे-नाशिक महामार्गाचे समन्वयक