मंत्रिपदावरून इच्छुक म्हणताहेत मेरा नंबर कब आयेगा..!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 10:14 AM2024-12-06T10:14:11+5:302024-12-06T10:14:11+5:30
मुख्यमंत्री, दाेन उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ, मंत्रिमंडळाची नावे गुलदस्त्यातच : पुण्यात कोणाच्या गळ्यात पडेल माळ
पुणे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी साेहळा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. मंत्र्यांची नावे मात्र अजूनही निश्चित झालेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातून मंत्री होण्यासाठी इच्छुक असलेल्यांची निराशा झाली. सगळे इच्छुक आता मंत्रिमंडळातील नावांच्या प्रतीक्षेत आहेत. अजित पवारांमुळे जिल्ह्यात उपमुख्यमंत्रिपद कायम राहिले आहे. तरीही अजून शहरात किमान २ आणि जिल्ह्याला २ मंत्रिपदांची अपेक्षा आहे. त्यामुळे ‘मेरा नंबर कब आयेगा’ अशी इच्छुकांची भावना झालेली आहे.
मुंबईतील आलिशान कार्यक्रमात नव्या सरकारचा शपथविधी झाला तरी त्यामध्ये फक्त मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अशा तिघांचीच शपथ झाली. मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांची नावे मात्र अद्याप जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (एकनाथ शिंदे) या महायुतीमधील तीनही पक्षांना जिल्ह्यात प्रतिनिधित्व मिळाले आहे. भाजपचे ९, अजित पवार गटाचे ८ व शिवसेना (एकनाथ शिंदे) यांचे १ असे एकूण १८ जण सत्तेतील आमदार आहेत. जुन्नरचे शरद सोनवणे हे अपक्ष म्हणून निवडून आले असून त्यांनी सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.
दावेदार अन् इच्छुकांना लागले वेध :
ज्येष्ठता, गुणवत्ता, पक्षातील महत्त्व, प्रादेशिक समतोल, सामाजिक समतोल, संख्याबळ, जनतेचा पाठिंबा असे अनेक निकष लावून मंत्रिपदासाठी नाव निश्चित केले जाते. तसेच राजकीयदृष्ट्या कोण, किती उपयोगाचे हेही पाहिले जाते. या कसोटीवर पुणे शहरात व जिल्ह्यातही अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तशी मोर्चेबांधणी देखील केली आहे. कोथरूडचे चंद्रकांत पाटील, आंबेगावचे दिलीप वळसे-पाटील यांची नावे निश्चित समजली जातात. त्यांच्याशिवाय पुण्यातून पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे सुनील कांबळे हे देखील मंत्रिपदाचे दावेदार आहेत. जिल्ह्यातून दौंडचे राहुल कुल, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, मावळमधील सुनील शेळके, पिंपरीचे अण्णा ऊर्फ अनिल बनसोडे, भोसरीचे महेश लांडगे, पुरंदरचे विजय शिवतारे हे देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.
जपून जपून घेतला जाताेय निर्णय
निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच मंत्रिपदासाठीचे सगळे इच्छुक आमदार मुंबईत आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डिंग लावून तयार आहेत. प्रत्यक्ष भेट, मागणी, मतदारसंघाची गरज अशा अनेक गोष्टी नेत्यांपर्यंत, पक्षश्रेष्ठींपर्यंत हस्ते, परहस्ते पोहोचवून त्यांनी जोरदार लॉबिंग केले आहे. वानखडेवर गुरुवारी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात किमान काही नावे घेतली जातील, अशी काहींना अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे त्यांची निराश झाली. मंत्र्यांची निवड करणे ही युतीतील तीनही नेत्यांसाठी मोठीच राजकीय कसरत राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच यावर सावकाश विचार करून निर्णय घ्यावा, असे त्यांच्यात ठरले असल्याचे दिसते