पुणे: कोरोनाचा प्रसार मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी वेगाने होत आहे. नागरिकांमध्ये भीतीसोबतच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षी कोरोना लढाईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची नेमणूक केली होती. त्याचप्रमाणे आताही आरोग्य विषयक तज्ञ व्यक्तींची टास्क फोर्स तयार करावी. अशी विनंती मायक्रो बायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी पत्राद्वारे केली आहे.
एक वर्षापूर्वी तयार केलेल्या टास्क फोर्सने खूप मेहनतीने काम केले. ते अनेकांना उत्तमरित्या कोरोनामुक्त करण्यात यशस्वी ठरले. याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. पण आताची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री यांनी अजूनही योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे.
नागरीकांमध्ये कोरोना उपचारासाबरोबरच लसीकरणाबाबतही अजून गोंधळाचे वातावरण आहे. सोशल मीडियावरील अर्धवट माहितीने नागरिक हैराण झाले आहेत. कोरोनावर उपचारासाठी पुरेशी औषधे नसल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहेत. तसेच लसीकरण प्रक्रियेतील पूर्ण माहिती अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे अनेक जण लस घेण्यास तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
नवीन टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील डॉक्टरांना एकत्र आणले पाहिजे. त्याशिवाय विविध आजारांवरील वैद्यकीय तज्ञांची समिती तयार करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांचे लस, आणि कोरोनावरील औषधोपचारबाबत अधिकृत माहिती देणारी समिती तयार केली पाहिजे. म्हणजे नागरिक गोंधळात राहणार नाहीत. टास्क फोर्सच्या तयारीसाठी सोसायटीच्या लोकांना सहभागी करून घ्यावे. असेही त्यांनी पत्रातून सांगितले आहे.