शिवरायांच्या मार्गानेच राज्याचा कारभार चालेल: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 04:04 AM2019-12-13T04:04:10+5:302019-12-13T04:04:49+5:30
किल्ले शिवनेरीवर घेतले शिवजन्मस्थळाचे दर्शन
पुणे: रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन-दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्राचा कारभार चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवनेरीगडावर व्यक्त केला. शिवजन्मस्थळी दर्शनाला जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माती उचलून कपाळी लावली.
किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे सपत्नीक दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर ‘शिवकुंज’ सभागृहातील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईच्या बाहेर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.
शिवजन्मभूमीत राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सामान्य रयतेला दिलासा देणारे, त्यांना न्याय देणारे कामच या ठिकाणी केले जाणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही मोठी जबाबदारी असून, सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवू या, असे ते म्हणाले.
कुलस्वामिनीचे घेतले दर्शन : मुख्यमंत्र्यांनी सकाळी सहकुटुंब लोणावळ्याजवळील कार्ला गडावर येऊन कुलस्वामिनी आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले. देवीची मनोभावे पूजा करत देवीची खणा- नारळाने ओटी भरत आरती करण्यात आली.