Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसात होणार आहे, या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाची चर्चा जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्रिपदाबाबत नाव उघड केलेले नाही, तर दुसरीकडे आता महायुतीमधील एका नेत्याने मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
उद्धव ठाकरे गटाची मुंबईतील संभाव्य उमेदवार यादी समोर; नवीन चेहऱ्यांना संधी, नावं वाचा
महायुतीमधील शिवसेना नेते माजी आमदार विजय शिवतारे यांनी आज टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलताना विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे. " महायुतीमध्ये अजिबात खदखद नाही, कधी कधी काही लोक वैयक्तिक बोलतात. शंभर नेते आहेत त्यातील काही लोक चुकीच बोलतात. महायुतीत अशी वक्तव्ये होऊ नयेत. बारामतीमधील अजित पवार यांच्या बॅनरवर बोलताना विजय शिवतारे म्हणाले, '२०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री आहेत, कदाचित पुढेही दोन , तीन वर्षेही तेच मुख्यमंत्री होतील', असं विधान शिवतारे यांनी केले.
"आताही आणि पुढेही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, अशी जनमाणसातील चर्चा आहे, लोकांना धडपड करणारा व्यक्ती हवा आहे, एकनाथ शिंदे हे एक महाराष्ट्राला मिळालेले वरदान आहे. असा व्यक्ती महाराष्ट्राला हवा आहे. २०२४ नंतरही तेच मुख्यमंत्री राहतील, असंही शिवतारे म्हणाले.
'पुरंदरमध्ये भाजपाला जागा सोडण्याची मागणी'
काल पुरंदर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या नेत्यांनी एकत्र येत या विधानसभेत उमेदवारीची मागणी केली आहे. यामुळे आता महायुतीत उमेदवारीवरुन धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आज विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली. शिवतारे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे जे ठरवतील त्यांना उमेदवारी मिळेल. देशात भाजपाचे सरकार आहे म्हणून विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार म्हणणे म्हणजे बालिशपणा आहे, असंही शिवतारे म्हणाले. एकनाथ शिंदे जे ठरवतील तो निर्णय मान्य करणार असंही शिवतारे म्हणाले.
"गुंजवणे प्रकल्पासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्न केले. १९९९ ते १०१४ पर्यंत त्या प्रकल्पाचा काम झालं नव्हतं. ते काम मी २०१४ पासून हातात घेतलं, आणि पुढं ते काम पूर्णत्वास आणलं आहे. पाईपलाईनची ऑर्डरही झाली. यानंतर माझ्या काही विरोधकांनी माझ्याविरोधात हायकोर्टात तक्रारी केल्या, असंही शिवतारे म्हणाले.