पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात येत आहे, याचा समाचार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित येऊन घेतला. ‘स्वत: शहराच्या विकासासाठी भाजपाने काय योगदान दिले? भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सवंग प्रसिद्धीसाठी नुसते आरोप करू नका. पुरावे द्यावे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. बिनबुडाचे आरोप चुकीचे आहेत. साप सोडून भुई धोपटायचे सोडून द्या, असे आव्हान भाजपाला दिले. प्रारूप प्रभाग रचनेत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला असून, राजकीय फायदा मिळविण्यासाठी प्रभागांची मोडतोड केली आहे. या विरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.भारतीय जनता पक्षाकडून शवदाहिनी, मूर्ती गैरव्यवहारप्रकरणी आरोप केले जात असून, आरोपांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवाणी, माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, जगदीश शेट्टी, हनुमंत गावडे, नाना काटे, महिला अध्यक्षा सुजाता पालांडे आदी उपस्थित होते. सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या, ‘‘चुकीच्या गोष्टींना राष्ट्रवादी प्रोत्साहन देणार नसून, कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. ’’योगेश बहल म्हणाले, ‘‘असमर्थता लपविण्यासाठी भाजपातील लोक भुई धोपटायचे काम करीत आहेत. शंभर दिवसांत अनधिकृत बांधकामे प्रश्न सोडवू, हे आश्वासन कुठे गेले? शहराच्या विकासासाठी कोणता पुढाकार घेतला? केवळ सेटलमेंटचे काम केले जात आहे. नुसत्या गप्पा मारून चालणार नाही. ऐनवेळेसचे विषय म्हणजे भ्रष्टाचार नव्हे. स्थायी समितीत यांचेही सदस्य काही काळ होते. त्या वेळी कोठे गेले होेते? प्रभाग रचनेत मोठी मोडतोड केली आहे. ही मोडतोड राजकीय द्वेषातून केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून प्रभाग रचनेत हस्तक्षेप केला. अकरा किलोमीटरपर्यंत एक प्रभाग केला आहे, अशी आमची माहिती आहे. प्रारूप प्रभाग रचनेत गोपनीयता आहे, असे प्रशासन सांगते.मात्र, भाजपाचे नेते नागरिकांना प्रभाग कसे केले, हे जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे याबाबत आरक्षण सोडतीनंतर याबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदविण्यात येणार आहे. वेळप्रसंगी न्यायलायातही जाऊ. जेएनएनयूआरएमचा निधीमागे गेला. मागासवर्गीय कल्याण निधी, याबाबत जे आक्षेप घेताहेत, झोपडपट्टी पुनर्वसन कोणामुळे थांबले?’’ (प्रतिनिधी)अनधिकृत बांधकामांबाबत केवळ गाजरस्मार्ट सिटीत पक्षीय राजकारण झाले. भाजपाला शहराबद्दल एवढा जिव्हाळा असता, तर केंद्राला प्रस्ताव देताना डावलले का? राजकीय फायदा राष्ट्रवादीला होईल म्हणूनच डावलले. निवडणूक आली की, अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा मुद्दा घेऊन आश्वासने द्यायची, हा व्यवसाय भाजपाचा आहे. अनधिकृत बांधकाम आणि शास्तीबाबत निव्वळ गाजर दाखविण्याचे काम केले जात आहे. दिशाभूल करण्याचे काम भाजपा करीत आहे. आता विकासकामांबद्दल आरोप करतात. भाजपात गेलेले पूर्वी सत्तेत होते की. त्यांना आत्ताच कोठून साक्षात्कार झाला?, असे संजोग वाघेरे म्हणाले.एकतरी आरोप सिद्ध करालोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे. सत्य समोर आणा. भ्रष्टाचार किंवा चुकीच्या गोष्टींना राष्ट्रवादीने कधीही पाठीशी घातले नाही आणि घालणारही नाही. पक्षाला बदनाम करण्याचा धंदा काही लोकांनी सुरू केला आहे. एकतरी आरोप सिद्ध करा. काही प्रकल्प थांबले, ते कोणामुळे थांबले? एकीकडे प्रकल्प अडवायचा. दुसरीकडे का अडला, म्हणून बोंब मारायची. असेच काम भाजपा करीत आहे., असे आझम पानसरे म्हणाले.
प्रभागरचनेत मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप
By admin | Published: September 28, 2016 4:44 AM