बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत घेतलेल्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाषणातून टीका सुरू करताच संतप्त राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणा सुरू केल्या. या कार्यकर्त्यांच्या दिशेने पोलीस धावून आल्याने पळापळ झाली.महाजनादेश यात्रेदरम्यान बारामतीत हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांचे १२ ते १३ मिनिटांचे भाषण झाले. त्यात पवारांवर टीका सुरू होताच राष्ट्रवादी समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी घोषणा या समर्थकांच्या दिशेने धाव घेतली. त्यांना पाहून समर्थकांची पळापळ झाली. यात्रा रवाना होतानादेखील राष्ट्रवादी समर्थकांची ‘एकच वादा अजितदादा’ अशी घोषणाबाजी सुरूच होती.यात्रेत मेंढ्या घुसविण्याचा इशारा धनगर समाजातील आंदोलकांनी दिला होता. त्यामुळे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊ न मुख्यमंत्र्यांकडे नेले. धनगर समाजाला आरक्षणाचा शब्द दिला होता, त्याचे काय झाले? आंदोलकांचे गुन्हे कधी मागे घेणार, असा मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला. यावेळी झालेल्या खडाजंगीनंतर मुख्यमंत्री निघून गेले.
शरद पवारांवरील मुख्यमंत्र्यांच्या टीकेमुळे घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 6:52 AM