भिगवण : कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीच्या काळात इंदापूर तालुक्याचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करताना अनेक अडचणी निर्माण होत असून सक्षम अधिकाऱ्यांच्या तातडीने नियुक्त्या करा, अशी मागणी राज्य ग्राहक संघटनेचे सदस्य तुषार झेंडे पाटील यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली. याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल करून माहिती देण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रभारी आहेत. महामारीच्या काळात आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम अधिकारी असणारे तहसीलदारपद देखील प्रभारी/अतिरिक्त आहेत. इंदापूर तालुक्याचे आरोग्य अधिकारी हे देखील प्रभारी आहेत. या तीनही पदावर सक्षम अधिकारी यांची नियुक्ती झालेली नाही. सध्या राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती असताना आणि त्यातच कोरोना संसर्गाची दुसरी लाट चालू असताना इंदापूर तालुक्यामध्ये प्रशासन यंत्रणा राबविणारी, कायदा सुव्यवस्था राखणारी तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार हे पद प्रभारी /अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकत नाही असेही निवेदनात म्हणण्यात आले आहे. ज्या आरोग्य यंत्रणेच्या जिवावर तालुका लढतोय त्या आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी पदही प्रभारीच आहे. त्यामुळे आपत्तीच्या काळात या तीनही पदावर सक्षम अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी झेंडे पाटील यांनी मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.
इंदापूर तालुक्याचे आमदार हे महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत, त्यांच्याच तालुक्यात महत्त्वाची अधिकारी पदे प्रभारी असणे हे विशेष मानले जाते, तर विरोधकही या प्रभारी पदाबाबत आवाज उठवीत नसल्यामुळे आपत्तीच्या काळात सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय मिळणार नाही हे मात्र निश्चित.