लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीला सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दांडी मारली. यामुळे समितीच्या अध्यक्षा व सदस्यांनी प्रशासनाकडे प्रचंड नाराजी व्यक्त केली. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दांडी मारणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.महापालिकेच्या विधी समितीची बैठक शुक्रवारी सायंकाळी चार वाजता होती. याबैठकीत काही महत्त्वांच्या विषयांवर चर्चा होणार होती. मात्र, संबंधित खात्यांचा एकही अधिकारी या बैठकीला फिरकलाच नाही. त्यामुळे तब्बल तासभर वाट पाहून अखेर विधी समिती सदस्यांनी या बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेतला. समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकींना अधिकारी उपस्थित राहिले नसल्याने संतप्त झालेल्या विधी समिती अध्यक्षा अॅड. गायत्री खडके यांनी याबाबत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्याकडे अधिकारी उपस्थित राहत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर भिमाले व खडके यांनी आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन बैठकीला अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व त्यासंबंधीचा अहवाल समितीच्या पुढील बैठकीत सादर करावा, अशी मागणी केली. त्यावर आयुक्तांनी बैठकीला जे अधिकारी अनुपस्थित होते, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
प्रमुख अधिकाऱ्यांची दांडी
By admin | Published: May 13, 2017 4:54 AM