लोकमत न्यूज नेटवर्कभोर : विषाणुजन्य तापाने फणफणलेल्या भोर तालुक्यातील चिखलावडे बुद्रुक व वाठार हि. मा. गावातील १४ जणांना चिकुनगुनिया झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्राकडे तपासणीसाठी पाठवलेल्या रक्ताच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. १४ पैकी ८ जण चिखलावडे व ६ जण वाठार हि. मा. येथील असून त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले. दरम्यान, शक्रवारी राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्र पुणे येथील अधिकाऱ्यांनी चिखलावडे बु. गावाला भेट देऊन गावातील आजारी असलेल्या व आजारी नसलेल्या सर्वच लोकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. आंबवडे खोऱ्यातील भोरपासून १० किलोमीटरावर रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याला सुमारे ५०३ लोकसंख्येचे चिखलावडे बुद्रुक गाव आहे. गावातील वरचीवाडीत ७५ व रामवाडीत ५० घरे आहेत. १० जूनला गावातील लोकांना थंडी, ताप, खोकला, खांदेदुखीच्या आजाराचा त्रास सुरू झाला होता. त्यानंतर भोर पंचायत समितीच्या आरोग्य पथकाने गावात जाऊन १२ जूनपासून तात्पुरते उपचार करून गावात दोन वेळा कारेडा दिवस पाळून धूरफवारणी केली होती. मात्र साथ वाढतच गेल्यामुळे गावातील सुमारे १८ लोकांना उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील १४ जणांच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्र पुणे येथे पाठविले होते. त्याचा अहवाल गुरुवारी आला. यातील १४ जणांना चिकनगुन्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र या लोकांवर उपचार करून त्यांचा आजार बरा झाल्याचे डॉ. सुर्दशन मलाजुरे यांनी सांगितले.
‘त्या’ चौदा जणांना चिकुनगुनिया
By admin | Published: June 24, 2017 5:48 AM