पिंपरी : निगडी परिसरात घरात खेळता खेळता इलॅस्टिक दोरीचा गळफास लागून मुलगा मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सिद्धिविनायक नगरी येथे ही दुर्घटना घडली. नकुल कुलकर्णी (वय ८) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या मुंजीचा कार्यक्रम आयोजित केला होता. अवघ्या दहा दिवसांनी कार्यक्रम असल्याने घरात सर्वांची लगबग सुरू होती. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील आनंदाचे वातावरण या घटनेने दु:खात बदलून गेले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात खेळता खेळता नकुल याला गळफास बसला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्या वेळी आजी-आजोबा बाहेरच्या हॉलमध्ये बसले होते. तर आईवडील मुंजीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते. दहा दिवसांनी मुंज असल्यामुळे या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. नकुल आतल्या खोलीत खेळत होता. खुंटीला अडकवलेल्या इलॅस्टिक बरोबर तो खेळत होता. खेळताना त्याला अचानक गळफास लागला. गळा आवळला गेल्याने त्याला ओरडता येत नव्हते. त्याच्यावर बेतलेल्या संकटाबद्दल त्याला काही सांगता आले नाही. आजी-आजोबांना त्याचा आवाज ऐकू आला नाही. काही क्षणातच त्याचा जीव गेला.मुंज होण्याआधीच काळाचा घालाब्राह्मण समाजात लहानपणी मुलाची मुंज केली जाते. बटुची मुंज म्हणजे एक प्रकारे विवाह सोहळाच असतो. विवाहाचा मुहूर्त काढला जातो. पत्रिकावाटप केले जाते़ मुंजच्या विधीनंतर भोजनाचा कार्यक्रम असतो. विवाह सोहळ्यासारखाच हा समारंभ असल्याने कुलकर्णी कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू होते. अवघ्या दहा दिवसांवर मुंजीचा कार्यक्रम येऊन ठेपला असताना, ही दुर्घटना घडली. मुंज होण्याआधीच त्याच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गळफास लागून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 2:14 AM