दौंड (पुणे) :पुणे येथील सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे दौंड येथील अष्टविनायक महामार्गावरील नादुरुस्त चेंबरमध्ये पडून अनुष चव्हाण ( वय १२, रा. गोवा गल्ली, दौंड) या मुलाला जीव गमवावा लागला. दरम्यान, मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी केले असून, ठिय्या आंदोलनासह रास्ता रोकोही केला.
दौंड येथील नेहरू चौकात अष्टविनायक महामार्गावरील नादुरुस्त चेंबर असून, या चेंबरमध्ये अल्पवयीन मुलगा पडला आणि त्याच्या पायावरून उसाचा ट्रॅक्टर गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार संजय पाटील, मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
नेहरू चौक ते गोवा गल्ली दरम्यान अष्टविनायक महामार्गावर ड्रेनेज लाईनचा चेंबर फुटलेला असून, या ठिकाणी वारंवार अपघात झालेले आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना आणि लेखी स्वरूपात निवेदन दिलेले होते. मात्र, याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने त्यातच ठेकेदारावर अंकुश नसल्यामुळे दौंड शहरात अष्टविनायक महामार्गाचे काम ढिसाळ पद्धतीने झालेले आहे. या कामाची चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने केलेली आहे. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अश्विन वाघमारे, भीम क्रांती सेनेचे अध्यक्ष बंटी वाघमारे, रितेश सोनवणे, तुषार जाधव, यश भालसेन, करण खाडे, चांद बादशाह शेख, श्रीनाथ ननवर आदी उपस्थित होते.
बालकाचा मृत्यू झाला नसता
दौंड येथील नेहरू चौक परिसरात एक धोकादायक चेंबर असून, या चेंबरच्या खड्ड्यात दुचाकीस्वार, पादचारी पडून अपघात झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने, दुर्लक्ष केले. परिणामी अधिकाऱ्यांचे आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नादुरुस्त चेंबरच्या खड्ड्यात वंचित बहुजन आघाडी आणि भीम क्रांती सेनेने वृक्षारोपण केले होते. जर वेळीच हे खड्डे दुरुस्त केले असते तर एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता.
शासनाला शहाणपणा येईल का?
अनुष् चव्हाण या अल्पवयीन मुलाचे आई-वडील यांचे गेल्या दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. दरम्यान, त्याचा सांभाळ त्याची आजी करत होती. परंतु, काळाच्या ओघाने आणि शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आता तरी शासनला शहाणपणा येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.