पुणे : शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे सुतोवाच केले होते. याबाबत शरद पवार संभ्रम निर्माण करत असल्याचे अजित पवार म्हणाले होते. त्यावरून शुक्रवारी शरद पवार यांनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला. राजकारणात बालबुद्धी असलेले अनेक लोक असतात. याच बालबुद्धीने ते बोलत असतात, त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचे? अशा शब्दांत शरद पवारांनी टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यापासून काका-पुतण्यांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला आहे. आता शिरूर लोकसभा मतदारसंघामुळे काका-पुतण्या पुन्हा आमनेसामने आले आहेत. शुक्रवारी पुण्यात खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्यानंतर शरद पवार बोलत होते. प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाजपमध्ये विलीन करावा असे विधान केले. शरद पवार यांनी ही ऑफर फेटाळून लावली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्यामुळे संसदीय लोकशाही धोक्यात आहे. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत कधीही जाणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
आम्ही आमचे विचार सोडून कुठेही जाणार नाही...
शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदींमुळे लोकशाही धोक्यात आहे. मोदींनी सोरेन, केजरीवाल यांना तुरुंगात टाकले. गांधी-नेहरूंची विचारधारा आम्हाला मान्य आहे. हा देश एक ठेवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन जावे लागणार आहे. पंतप्रधान केवळ एका धर्माबाबत वेगळी भूमिका मांडत आहेत. एका समाजाविरुद्ध वेगळी भूमिका घेतल्यास देशात ऐक्य राहणार नाही. नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले आहेत, त्यातूनच ते अशी विधाने करत आहेत. मोदींना जरी आमची गरज वाटत असेल तरी आम्ही आमच्या बुद्धीला जे पटते त्या विचारांना सोडून कुठेही जाणार नाही, असेही पवार म्हणाले.