पुणे : कारागृहात जन्म घेणाऱ्या नवजात बालकांना आता नवी ओळख प्राप्त होणार आहे. यापूर्वी त्यांच्या जन्म दाखल्यावर जन्म ठिकाण म्हणून संबंधित कारागृहाचे नाव लिहिले जायचे. मात्र, राज्य शासनाच्या आदेशानुसार आता कारागृहात जन्म झालेल्या बालक बालिकांच्या जन्म दाखल्यामध्ये जन्मस्थान म्हणून त्या त्या शहराचे किंवा गावाचे नाव नमूद केले जाणार आहे.
राज्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहेत. अनेकदा या कारागृहांमध्ये गरोदर स्त्रियांना देखील विविध गुन्ह्यांमध्ये अटक केल्यानंतर रहावे लागते. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर अनेक महिला कारागृहामध्ये शिक्षा भोगण्यासाठी पाठविल्या जातात. गरोदर असलेल्या महिलांची प्रसूती झाल्यानंतर त्यांच्या मुलांचे जन्म दाखले शासकीय नियमाप्रमाणे तयार केले जातात. यापूर्वी या जन्मदाखल्यांवर जन्मस्थान म्हणून संबंधित कारागृहाचे नाव नमूद केले जात असे. त्यामुळे ही मुले मोठी झाल्यानंतर किंवा संबंधित महिलांची शिक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या मुलांना विविध शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे अवघड होते.
तसेच त्यांना नोकरी-व्यवसाय करण्यासाठी देखील दाखल्यावरील जन्म ठिकाणाच्या नोंदीमुळे अडचणी निर्माण होत होत्या. याच गोष्टीचा संवेदनशीलपणे विचार करून शासनाने कारागृहात जन्म घेणाऱ्या बालक-बालिकांच्या जन्मस्थानाचा मुद्दा आता निकाली काढला आहे. यापुढे कारागृहात जन्म घेतलेल्या मुलांच्या जन्म दाखल्यावर कारागृह ज्या शहरांमध्ये असेल किंवा गावांमध्ये असेल त्या शहर किंवा गावाचे नाव नमूद केले जाणार आहे. त्यामुळे या मुलांसमोर भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत मिळणार आहे.