पुणे : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दर वर्षी बाल दिन साजरा केला जातो. ‘लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत,’ असे ते म्हणायचे. ‘लोकमत’ कार्यालयात हा बाल दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मराठी चित्रपटातील बालकलाकारांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देत वर्तमानपत्राचे काम कसे चालते, त्यामागील यंत्रणा कशी चालते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. संपादकीय, मनुष्यबळ विकास, इव्हेंट, वितरण, जाहिरात अशा विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांसह त्यांनी बाल दिनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष कामामध्ये खारीचा वाटा उचलला. शाळेतील मर्यादित विश्वाच्या बाहेर पडून अनुभवायला मिळालेले हे विश्व खूप काही शिकवून गेले. हा अनुभव कायम आठवणीत राहील, अशी प्रतिक्रिया ‘ओली की सुकी’ या चित्रपटातील बालकलारांनी व्यक्त केली. ‘वर्तमानपत्र हा मोठा शब्दकोश आहे,’ अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)अदिती देवळणकर : आजवर वर्तमानपत्राचे काम कसे चालते, याबाबत काहीच कल्पना नव्हती. आज ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिल्यावर कामाचा व्याप पाहून आश्चर्य वाटले. एका पेपरमागे किती जणांचे कष्ट असतात, हे जाणून घेता आले. चिन्मय संत : वर्तमानपत्रातून विविध गोष्टींचे ज्ञान मिळते. दररोज घरी पेपर पाहायला मिळतो. त्यामागची व्याप्ती आज बारकाईने समजली. स्वप्निल कणसे : वर्तमानपत्र हे माहिती देणारे महत्त्वाचे माध्यम आहे. यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. अथर्व बागेवाडी : चहा आणि पेपर हे समीकरण प्रत्येक घरात पाहायला मिळते. माहिती देणारे हे साधन म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नसून, अवघा शब्दकोशच आहे. क्षितिज कुलकर्णी : वर्तमानपत्राच्या कार्यालयातील विविध विभागांना भेट देऊन खूप आनंद झाला. येथे मिळालेले ज्ञान जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. अरुण गावडे : एका पेपरमागे किती जण कष्ट करतात, हे प्रत्यक्ष पाहून खूप आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. यापुढे दररोज वर्तमानपत्र वाचण्याचा पण केला आहे. प्रथमेश शिवले : शाळेचे विश्व काहीसे मर्यादित असते. आज शाळेच्या बाहेर पडून नवीन विश्वाची ओळख करून घेता आली, याचा आनंद होत आहे. रोहन शेंडगे : बाहेरचे जग समजून घेण्यासाठी, नवीन माहिती मिळविण्यासाठी वर्तमानपत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे लोकमतच्या कार्यालयाला भेट देऊन खूप समाधान वाटत आहे.
बालकलाकारांनी अनुभवले वर्तमानपत्राचे जग
By admin | Published: November 15, 2016 3:43 AM