पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री आणि गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांनी विधिमंडळात केलेल्या आवाहनानंतर लोकसेवा प्रतिष्ठानने गडचिरोली जिल्ह्यातील ४२ मुले दत्तक घेतली. त्यांतील १५ विद्यार्थ्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली. ते सर्व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून, दोन विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण; तर ७ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.कोणत्याही मदतीविना २००८पासून हे विद्यार्थी लोकसेवा प्रतिष्ठानच्या फुलगाव येथील शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील मुलांना पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांनी दत्तक घेतले, तर ती मुले नक्षलवादी होण्याऐवजी चांगली सुशिक्षित माणसे होतील, असे मत आर. आर.पाटील यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर लोकसेवा प्रतिष्ठाने याला प्रतिसाद देऊन ४२ मुले दत्तक घेतली. त्यांतील १५ विद्यार्थ्यांनी आज दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविले.लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे म्हणाले, ‘‘आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असलेल्या गुणवान विद्यार्थ्यांनाही लोकसेवा प्रतिष्ठानने विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. ‘‘सध्या १३८ विद्यार्थी या दत्तक योजनेअंतर्गत शिक्षण घेत आहेत. गडचिरोलीच्या मुलांनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची स्वप्नपूर्ती केली आहे.’’(प्रतिनिधी)
(छायाचित्र प्रातिनिधीक)