निशांत वाकोडे -
पुणे: काही मुलांच्या आयुष्यातला ' बालदिन ' हा आकर्षक गिफ्ट,बागेतली मज्जा, भरपेट खाऊ, तसेच सहली यांनी समृध्द असतो. तर दुसरीकडे आभाळाचे छत , अंग झाकण्या इतपत देखील अपुरे कपडे, आयुष्याची दिशा सिग्नल, बसस्थानके , रेल्वेस्टेशन, यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांपुरतीच मर्यादित , यातना आणि अवहेलनेच्या चटक्यांसह रिकाम्या हातावर जे काही चार दोन रुपये , खाण्याच्या वस्तू पडतील ते स्विकारुन दोन घासांची सोय करत 'बाल दिन ' साजरा करणारे देवाघरची फुले..अर्थात त्या चिमुरड्यांना कुठे ठाऊक असेल बालदिन. त्यांचं आपलं सूर्य उगवला की रस्त्यावर आणि मावळला की फुटपाथवर.. एवढी छोटी जीवनरेषेने बंदिस्त मंडळीच्या ओठी एकच प्रश्न होता तो म्हणजे..बालदिन म्हंजी काय ओ.. दादा.? बालदिन म्हणजे काय.? तो १४ नोव्हेंबर लाच का साजरा करतात, अशी सर्व माहिती त्यांना आजपर्यंत कुणी सांगितली पण नाही. आणि समजा चुकून कुणी दिलीही असेल तरी वर्षभर लक्षात राहण्याचे काही कारण नाही.. त्यांना ती माहिती करुन घेण्याची गरजही कधी पडली नाही. पण अशा काही मंडळींशी बालदिनाच्या निमित्ताने लोकमत प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यात ही छोटी छोटी चिमुरडी मुले, त्यांचे कुटुंब गाव, नातेवाईक यांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात वास्तव्याला येतात. त्यातील काही लोक हे युपी ,बिहारचे आहेत .तिकडे पुरेसा रोजगार नाही, स्वत:च्या हक्काची घरे नाही, शिक्षणाचा अभाव , आरोग्याच्या अपुऱ्या सोयी, कमी वयात मुला मुलींचे होणारे लग्न आणि त्यातून त्यांना होणारे अपत्य ही या देशाच्या नागरिकांची दयनीय अवस्था. या सर्व परिस्थितीत अठरा विश्व दारिद्रयाला सोबती घेत ही मंडळी रोजचा दिवस फक्त पुढे ठकलत असतात. हीच यांची दिशा राहिली तर भविष्याविषयी काय बोलणार.. शिक्षणापासून वंचित असलेली ही चिमुरडी बालके वर्षानुवर्षे त्याच अवस्थेत जगत राहतात. पुढे मग त्यांचा गुन्हेगारी, अवैध धंदे, चोऱ्या यात उपयोग होवू लागतो. दोन पैशांच्या कमाईसाठी ते रोजचे २४ तास आणि संपूर्ण आयुष्य भीतीच्या छायेखाली जगू लागतात. काही दिवसांनी ही अल्पवयीन मुले इतकी असंवेदनशील होतात की आपण काय करतोय, त्याचे भविष्यात जीवनावर किती भयानक परिणाम होणार आहे याचे जरासेही भानही त्यांना राहत नाही. परंतु, हा प्रश्न असाच सुरु राहील विना उत्तर कुणी पुढेच आले नाही तर.. कुठेतरी त्या मुलांच्या भवितव्याची पूर्ण नाही पण ५०- ५० टक्के जबाबदारी उचलली तर काहीतरी मार्ग निघू शकतो. सामाजिक बांधिलकी , संवेदनशील मन यांनी ही दरी नक्की भरुन येईल.काहीजण अशाच अंधारलेल्या वाटेवर शिक्षणाचा प्रकाशदिवा लावत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत वेगवेगळ्या क्षेत्रात यशाचा झेंडा फडकविणाऱ्या मुलांची नावे झळकल्याची उदाहरणे देखील समाजात पाहायला मिळत आहे....