पिंपरी : शाळेत जाण्याच्या वयात मुलांना व्हाइटनर सेवन, तसेच हुक्क्याचे व्यसन जडू लागले असेल, तर ते अत्यंत घातक आहे. व्यसनाधीनता ही एक मानसिकता आहे. या मानसिकतेची वेळीच दखल घेतली पाहिजे. पालकांनी मुलांना अशा व्यसनांपासून दूर ठेवले, तरच त्यास वेळीच अटकाव आणणे शक्य होईल, असे मत मानसोपचार तज्ज्ञ, मेंदूविकारतज्ज्ञ, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अन्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये टपऱ्यांवर पेन हुक्का राजरोसपणे विक्री होतो, हे वृत्त लोकमतमध्ये वाचले. याबाबतची माहिती घेण्यास सांगितले असून, अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. पेन हुक्का पानटपऱ्यांवर विक्री होत असेल, तर पेन हुक्का नेमका काय आहे, हे पाहावे लागेल. खातरजमा करून पुढील कारवाई करणे शक्य होईल. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने याबाबत दखल घेऊन कारवाई करण्यात येईल.- अर्जुन भुजबळ, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनव्यसन कशाचेही असो; त्याचा मेंदूवर परिणाम होतोच. काही काळ मनाची अवस्था वेगळी होते. त्यामुळे कोणतेच व्यसन नसावे. व्यसन जडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लहान मुलांमध्ये विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये हुक्क्याचे फॅड आहे. बालवयात व्यसनाची सवय लागणे अत्यंत घातक आहे. व्यसनामुळे फुफ्फुसावर, तसेच मेंदूवर परिणाम होतो. मेंदूशी निगडित समस्या उद्भवतात. कायमचा मेंदूविकार जडण्याची शक्यता असते. संबंधित व्यक्तीच्या आयुष्यावर, परिणामी त्याच्या कुटुंबावर याचे दूरगामी परिणाम जाणवतात. त्यामुळे पालकांनी सतर्कता दाखवून मुलांना व्यसनापासून दूर ठेवले पाहिजे. शाळांमध्ये, तसेच विविध ठिकाणी चर्चासत्र आयोजित करून मुलांमध्ये जागृती केली पाहिजे. - डॉ. उमेश फाळके, मेंदूविकारतज्ज्ञ केवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच नाही, तर शाळेत शिकणारे अल्पवयीन विद्यार्थीसुद्धा पेन हुक्क्याच्या आहारी गेले आहेत, ही चिंतेची बाब आहे. पेन हुक्का, इलेक्ट्रिक सिगारेट बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याची क्रेझ असली, तरी पालकांनी जागरूकता दाखवली पाहिजे. नवीन काही बाजारपेठेत आल्यास त्याबद्दलची उत्सुकता वाढते, परंतु ते अहितकारक असेल, तर वेळीच विक्रीपासून रोखले पाहिजे. शासनाने पेन हुक्क्यासारख्या वस्तूंच्या विक्रीवर बंदी आणली पाहिजे. काहींना तात्पुरते आकर्षण वाटते, तर काहीजण आहारी जातात. शालेय वयात विद्यार्थी व्यसनाकडे झुकत असतील, तर शासनाने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. - डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय अधिकारी
विविध प्रकारच्या फळांचा सुगंध असणारे द्रव्य वापरात येत असले, तरी त्यात निकोटिनसारखा घातक पदार्थ असण्याची शक्यता असते. जसे अन्य प्रकारच्या नशा केल्या जातात. तशाच प्रकारे पेन हुक्क्याचा वापर करून नशा केली जाते. ही व्यसनाधीनतेकडे जाण्याची पहिली पायरी आहे. पालकांनी जागरूकता दाखवली पाहिजे. सिगारेट, व्हाइटनर या गोष्टी आता कॉमन झाल्या आहेत. मुले काय करतात, त्यांच्यावर कोणत्या चुकीच्या गोष्टींचा प्रभाव आहे, याकडे पालकांचे लक्ष हवे. पालकांनी सतर्कता दाखवली, तरच या प्रकारावर नियंत्रण आणता येईल. - डॉ. धनंजय अष्टुरकर, मानसोपचारतज्ज्ञ झोपडपट्ट्यांमधील मुलांना पेन हुक्क्याचे मोठ्या प्रमाणावर आकर्षण असल्याचे निदर्शनास आले. इलेक्ट्रिक सिगारेट, पेन हुक्का असे काही बाजारात, पान टपरीवर मिळते, याबद्दल अद्याप आपण अनभिज्ञ आहोत. लहान मुलांना मात्र हे कधीच माहिती झाले आहे. हुक्क्यामध्ये वापरात येणारे द्रव्य शरीराला अपायकारक नसल्याचा दावा अनेकजण करतात. मात्र ते द्रव्य (लिक्विड) नेमके काय आहे, ते प्रयोगशाळेत तपासले आहे का, खरेच ते अपायकारक आहे की नाही, याबाबत माहिती नसताना सर्रासपणे ते बाजारात विक्री होत आहे. पेन हुक्का आॅनलाइन खरेदी करता येते. आॅनलाइन खरेदी प्रकारावर शासनाचे नियंत्रण हवे. अपायकारक असल्यास त्यास बंदी घालणे शक्य होईल. - डॉ. नितीन बोरा, समुपदेशक