रविकिरण सासवडे
बारामती : ‘मुलं ही देवाघरची फुलं’ असं म्हटलं जातं. मात्र केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कच्च्याबच्च्यांसह रानोमाळ फिरणाऱ्यांच्या पाठी या कोवळ्या फुलांचं बालपण अक्षरश: कोमेजून जातं. ढोल बडवून कितीही बालदिन साजरे केले. तरी ग्रामीण भारतात आजही ‘बाल दीन’च आहेत. अच्छे दिनचं स्वप्न दाखवणाºया डिजिटल इंडियामध्ये ग्रामीण भारतातील कोवळी बालके अद्याप भुकेशी संघर्ष करीत आहेत.
१४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत हा संघर्ष पुढे आला आहे. असं म्हंटलं जातं, की उज्ज्वल भविष्य पुढील पिढ्यांच्या हाती असतं. ग्रामीण भारतातील पुढच्या पिढ्या अजूनही जगण्यासाठीच संघर्ष करीत आहेत. शाळा, शिक्षण, आरोग्य या गोष्टी या बालकांपासून कोसो दूर आहेत. ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्यांमध्ये मनीषा, माया, शीतल, कृष्णा, सुरेखा, रवी या चिल्ल्यापिल्ल्यांच्या स्वप्नांना खºया अर्थाने मायेच्या आधाराची गरज आहे. कोणी वीटभट्टीवर उपाशी राबणाºया आईचं काम हलकं करीत आहे. तर कोणी फडात तुटलेल्या उसाचं वाडं बांधून बापाच्या कष्टाला हातभार लावीत आहे. कोणी अवघ्या चार वर्षांचा, तर कोणी नऊ वर्षांची चुणचुणीत मुलगी.
‘कशाचा बालदिन इथं पोट महत्त्वाचं आहे. दुष्काळाशी दोन हात करत जगावं लागतं. पोरांच्या पोटाची काळजी घ्यायची का त्यांना शिकवायचं. पोरगं जगलं तर शिकलं. म्हणून पोटाच्या मागं पळावं लागतं,’ अशी व्यथा औरंगाबाद जिल्ह्यातील भादली गावच्या लक्ष्मण बाळाजी बागुल यांनी मांडली. तर ‘आम्ही आदिवासी, मजुरी करीतच आमचंही बालपण गेलं. मागच्या वर्षी घरकुल मंजूर झालं. ग्रामसेवकानं आडवं लावलं. सगळी कागदं दिली तरी घरकुल काय मिळालं नाही. कामाच्या मागं पळत विंचवाचं बिºहाड व्हावं लागतं. अशी कैफियत एकलव्य आदिवासी समाजाचे अशोक सोनवणे यांनी सांगितली. शहरालगत ऊसतोडणी, वीटभट्टी कामगारांची मुले लक्ष वेधून घेतात. शासन शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठीदेखील शासन मोठ्या प्रमाणात योजनांवर खर्च करीत आहे. मात्र येथील बालकांचे विदारक चित्र पाहिल्यावर शासन यांच्यापर्यंत पोहोचलेच नसल्याचे वास्तव आहे.उपचारांचीही वाणवामागील वर्षी याच दिवसांमध्ये इथं ऊसतोडीसाठी आलो होतो. दीड वर्षाचा माझा मुलगा थंडी-तापानं आजारी पडला. एक-दोन वेळा दवाखान्यातसुद्धा नेलं, मात्र काही फरक पडला नाही. मोठ्या दवाखान्यात जायला पैसे नव्हते.आम्हाला सोडून लेकरू कायमचं गेलं, अशी अंगावर शहारे आणणारी शोकांतिका पाणावलेल्या डोळ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील भादली गावच्या सुभाष शंकर सोनवणे यांनी सांगितली.