लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुलांची मानसिकता ओळखून मुलांसाठी मनोरंजनात्मक नाट्यलिखाण करणारी लेखकांची नवी पिढी घडवण्याचे उद्दिष्ट ठेवून बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती, मुंबईने या वर्षापासून ‘रत्नाकर मतकरी स्मृती’ बालनाट्य लेखन प्रोत्साहन पुरस्कार योजना सुरू केली आहे. पहिल्याच वर्षी एकूण २६ बालनाटिका दाखल झाल्या. त्यापैकी ११ संहितांना उत्कृष्ट, उत्तम आणि प्रशंसनीय अशा श्रेणीत विभागून प्रोत्साहन पुरस्कार घोषित केले आहेत.
यामध्ये उत्कृष्ट पुरस्कार कै. लीलाबाई जनार्दन चितळे स्मरणार्थ रोख व प्रमाणपत्र गोविंद गोडबोले (मिरज) लिखित ‘खेळण्याची करामत’ या बालनाट्यास तर सुनिता कुलकर्णी (लातूर) लिखित ‘खुडखुड’ या बालनाट्यास मिळाला. तर डॉ. संजय पाटील पुरस्कृत रोख रक्कम व प्रमाणपत्र नेत्रा श्रोत्री (पुणे) लिखित ‘टिमकी आणि चुटकी’ या बालनाट्यास, तर लेखिका स्नेहा राणे (ठाणे) यांच्या 'डॉ. अय्यर' या बालनाट्यास व लेखक सुभाष टाकळीकर (कोल्हापूर) यांच्या ‘कोल्हापुरी मिसळ’ या बालनाट्यास मिळाला. प्रशंसनीय संहिता प्रमाणपत्र सुनंदा साठे (नागपूर), विलास गुंजाळ (पुणे), संध्या कुलकर्णी (पुणे), प्रीती नौकरकर (नागपूर), गोविंद गोडबोले (मिरज), ऐश्वर्या बायस (बीड) यांना देण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात बालरंगभूमी परिषद, नागपूर जिल्हा शाखेतर्फे नांदीने केली. कार्याध्यक्ष नाथा चितळे यांनी प्रास्ताविक केले. परीक्षकांच्या वतीने उपाध्यक्ष राजू तुलालवार यांनी निवडलेल्या संहितांबाबत थोडक्यात माहिती दिली. दीपा क्षीरसागर यांनी पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांच्या पुरस्कारांची घोषणा केली.
बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पारखी म्हणाले, पुरस्कारप्राप्त संहितांचे अभिवाचन कार्यक्रम संबंधित जिल्हा शाखेत आयोजित करणार आहेत. पुरस्कारप्राप्त संहिता पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचा बालरंगभूमी परिषदेचा मानस आहे.
प्रमुख कार्यवाह सतीश लोटके यांनी आभार मानले. आसिफ अन्सारी, दीपा क्षीरसागर, ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.