पुणेः गुजरातच्या कच्छमध्ये पतंगाेत्सव भरलेला आपण अनेकदा पाहीला आहे. भल्यामाेठ्या, विविध आकार असलेल्या पतंग उडविण्यात येतात. प्राण्यांच्या चित्रांपासून ते माशांपर्यंत असे विविध पद्धतीच्या पतंग या महाेत्सवात असतात. तसाच काहीसा महाेत्सव पुण्यातील कात्रज भागात भरविण्यात आला हाेता. आर्यन्स वर्ल्ड स्कूल कॅम्पस संस्थेच्या शाळेच्या पटांगणात सगळ्यांसाठी पतंगमहाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. लहानग्यांपासून सर्वांनीच यावेळी पतंगाेत्सवाचा आनंद लुटला. यावेळी गुजरातमधील सुप्रसिद्ध पंतगोत्सवाशी संबंधीत तज्ज्ञ आणि प्रशिक्षित मान्यवर या पंतगोत्सवात सहभागी झाले होते. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, पंजाब आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ज्या पांरपारीक पद्धतीने मकरसंक्रांतीचा सण साजरा होतो त्याचा अनुभव या पंतगोत्सवाच्या निमित्ताने घेता आला. पंतग उडविण्याचा अनुभव त्यातून निर्माण होणारी चुरस शिगेला पोहचणारा उत्साह आणि पंतगांची काटाकाटी या सगळ्याचा आनंद मुलांनी घेतला.
आर्यन्स वर्ल्ड स्कुलचे संचालक मिलिंद लडगे यावेळी म्हणाले, पंतग उडविणे हा केवळ एक खेळ नसून मुक्त जगण्याचे बळ देणारा उत्सव आहे. मनातील आशा-आकांक्षांसह जीवनात यशस्वीपणे झेपावण्यासाठीचा आत्मविश्वास या खेळातून मिळतो. त्यामुळेच नवीन पिढीला पंतगांची विविध रुपे, आकार आणि प्रकार अनुभवाता यावेत यासाठी या महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. पतंग आणि भारतीय बनावटीचा मांजा तयार करण्याच्या माध्यमातून मुलांच्या सजृनशीलतेला चालना देण्यात येत आहे. याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे.