लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासनाने ५० टक्के क्षमतेने सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांचे प्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. बालनाटकांसाठी शासन निर्णयात स्वतंत्र उल्लेख नसला तरी बालनाट्यांचे आयोजन करण्यास संस्थांना कोणतीही हरकत नाही. मात्र ‘अलबत्या गलबत्या’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’ ही बालनाट्ये पुनश्च रंगमंचावर आणण्याची इच्छा असलेल्या निर्मात्याला मुंबई महापालिका प्रशासन बालनाट्याचा प्रयोग करण्यास नकार दर्शवित आहे. शासनाने बालनाट्य आयोजनांवर कोणतीही बंधने घातलेली नाहीत. पुण्यात प्रयोगांना परवानगी आहे मग मुंबईत का नाही? असा सवाल निर्मात्याने उपस्थित केला आहे.
दरवर्षी बालनाट्यांचा सुगीचा हंगाम ठरलेला असतो. उन्हाळी सुट्ट्यांबरोबरच, दिवाळी, ख्रिसमस सारख्या शालेय सुट्यांमध्ये बालनाट्यांचे प्रयोग रंगतात. गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका व्यावसायिक, प्रायोगिकप्रमाणे बालनाट्यांनाही बसला. शासनाने टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्र ‘अनलॉक’ केले. त्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांसह नाट्यप्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. परंतु
शासन निर्णयात बालनाटकांचा स्वतंत्र उल्लेख नसल्यामुळे बालनाट्यांचे आयोजन करण्यासंबंधी संस्थांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, बालनाटकांचा स्वतंत्र उल्लेख नसला तरी निर्माते बालनाट्यांचे प्रयोग लावू शकतात. पुण्यातही बालनाटकांचे प्रयोग करण्यास कोणतीही आडकाठी नसल्याचे महापालिका नाट्यगृह व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे. मग मुंबईबाबतच हा दुजाभाव का? ९ वी ते १२ वी पर्यंत शाळा सुरू झाल्या. खासगी क्लासेस ना देखील परवानगी मिळाली. मग कोरोना काय बालनाट्यांमुळे पसरणार आहे का? असा सवाल निर्मात्याने उपस्थित केला आहे.
-----
निर्मात्यांवर उपासमारीची वेळ
शासनाने रितसर व्यावसायिक, प्रायोगिक नाटकांना परवानगी दिली आहे. मग बालनाट्यांबाबत दुजाभाव का? शासनाने जी नियमावली जाहीर केली आहे. ती बालनाट्यांसाठी देखील वापरली जाणारचं आहे. वर्षभर बालनाट्ये होऊ न शकल्यामुळे निर्मात्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुंबई प्रशासनाने असा दुजाभाव न करता बालनाट्यांना परवानगी द्यावी.
- राहुल भंडारे, निर्माते, ‘अलबत्या गलबत्या’
----
मुलांना नाटकांसाठी कसं आणायंच
शासन निर्णयात बालनाट्यांच्या आयोजनासंदर्भात काहीही म्हटलेलं नाहीये. यातच अजूनही शाळा सुरू झालेल्या नाहीत. मग मुलांना नाटकांसाठी कसं आणायंच? असा देखील प्रश्न आहे. त्यामुळे बालनाट्यांचे आयोजन करण्यासंबंधी थोडासा संभ्रम आहे.
- प्रकाश पारखी, अध्यक्ष, नाट्यसंस्कार कला अकादमी
------
नाट्यगृह मागितले तर लगेच देणार
संस्थांना बालनाटकांचे आयोजन करण्यासाठी परवानगी आहे. मात्र, शाळा सुरू नसल्यामुळे अद्याप एकाही बालनाट्य संस्थांनी संपर्क साधलेला नाही. कुणी बालनाट्यासाठी नाट्यगृह मागितले तर ते नक्कीच दिले जाईल.
- सुनील मते, मुख्य व्यवस्थापक बालगंधर्व रंगमंदिर