लोकमत न्यूज नेटवर्क
ओतूर : जुन्नर तालुक्याच्या उत्तर आणि पश्चिम भागात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे येथील नद्या आणि ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. पावसामुळे येथील जुने आणि मातीचे असलेले मांडवी नदीवरील चिल्हेवाडी धरण हे ओव्हरफ्लो झाले असून धरणातून पाण्याचा विसर्ग मांडवी नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे.
चिल्हेवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता १ टीएमसीची आहे. मांडवी नदी, चिल्हेवाडी, आंबेगव्हा, रोहोकडी, ओतूर, ठिकेकरवाडी, धोलवड, हिवरे खूर्द, ओझर (गणपतीचे) या गावहुन शेवटी कुकडी नदीला मिळते. नदीने पुररेषा ओलांडल्यामुळे ओतूर ग्रामपंचायतीने नदीकाठच्या लोकांना सतर्क राहाण्याचा इशारा दिला आहे. ओतूरच्या उत्तर पश्चिम पट्यातील कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभुळशी, काठेवाडी, माळवाडी, कुडाळवाडी आदी गावांत चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या विभागातील भातखाचरांचे बांध फुटले आहेत. काही ठिकाणी चांगली वाढ झालेली भात पिके वाहून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या भात पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
ओतूर परिसरातील आंबेगव्हाण रोहोकडी येथे पावसामुळे भाजीपाला व नवीन लागवड केलेल्या टोमेटो पिकांचे नुकसान झाले आहे, असे रोहोकडीचे शेतकरी पोपट घोलप यांनी सांगितले. डोमेवाडी येथील शेतकरी बबनराव भोरे म्हणाले, या विभागात शेतात पाणी साचल्याने काकडी, फ्लाॅवर, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. उदापूर परिसरात लागवड केलेले टोमेटो व ज्यांची तोडणी सुरू असलेल्या काकडी,भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. हा पाऊस सोयबीन पिकाला पोषक आहे, असे शेतकरी राहुल शिंदे यांनी सांगितले.
फोटो : चिल्हेवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून मांडवी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे.