लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : पतीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून गावाबाहेर असणाऱ्या खाणीत साठलेल्या पाण्यात उडी घेतलेल्या आईला वाचवताना दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपळी (ता. बारामती) येथे ही घटना शनिवारी (दि.२९) पहाटे घडली. या घटनेत ज्या आईला वाचवण्यासाठी मुलांनी पाण्यात उडी घेतली, त्या आईला मात्र, पतीने सुखरूप बाहेर काढले. मात्र, मुलांना बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दिव्या सूर्यवंशी (वय ४) आणि शौर्य सूर्यवंशी (वय २) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. शनिवारी (दि.२९) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील अतुल सूर्यवंशी आणि अंजली सूर्यवंशी (दोघे रा. पिंपळी, ता. बारामती) या पती पत्नी मध्ये भांडण झाले. त्यामुळे अंजली ही रागाच्या भरात आत्महत्या करण्याचा निर्णय घेत पिंपळी येथील खाणीच्या पाण्याच्या दिशेने निघाली. खाणीच्या ठिकाणी पोहचल्यावर रागात अंजिलीने पाण्यात उडी देखील मारली. मात्र, याच वेळी आईला पाहण्यासाठी त्यांची दोन मुले दिव्या (वय ४) व शौर्य (वय २) हे दोघे पाठोपाठ आले होते. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात ही दोन्ही मुले एकापाठोपाठ पाण्यात पडली.
याच वेळी पती अतुल ही पाठोपाठ आला. त्याने अंजलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेत तिला पाण्याबाहेर काढले. मात्र, या दरम्यान दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुले लहान असल्याने त्यांना वाचविण्याची संधी मिळाली नाही. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेनंतर या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह घटनेनंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते.