पुणे : पर्यावरणपूरक गणपतींच्या मूर्ती तयार करून लहान मुलांना माेफत प्रशिक्षण देण्याचे काम पर्यावरण अभ्यासक मेधा टेंगसे या काही वर्षांपासून करत आहेत. नुकताच त्यांनी आपल्या परिसरातील चिमुकल्यांना पर्यावरणपूरक गणरायांबाबत माहिती देऊन त्यांच्याकडून छानशा मूर्ती तयार केल्या. त्याचे विसर्जनही घरातच करून ती माती पुन्हा वापरात आणण्यात येणार आहे. या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मत टेंगसे यांनी व्यक्त केले.
सध्या पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. पैशांची अधिकाधिक हाव पर्यावरणास धोकादायक ठरत आहे. त्यामुळे आता संवर्धनासाठी भावी पिढीलाच समजावून त्यांना याबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. छोट्या-छोट्या उपक्रमांमधून हा संदेश द्यायला हवा, म्हणून गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणरायांची घरात कार्यशाळा घेऊन चिमुकल्यांना त्याचे धडे दिले. अनेकांनी सुंदर मूर्ती तयार केल्या. त्यानंतर घरातच विसर्जनही केले. त्यामुळे काही प्रमाणात तरी पर्यावरणाचे संवर्धन झाल्याची भावना टेंगसे यांनी व्यक्त केली. टेंगसे म्हणाल्या,‘‘आता ज्या मातीपासून आम्ही गणराय साकारले. तीच माती पुढच्या वर्षी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नदी, ओढ्यात किंवा तलावात प्रदूषण होणार नाही. सध्या पुणे शहरातील सर्वच नद्या प्रदूषित झाल्या आहेत. घाण पाण्यात गणरायांचे विसर्जन करूच नये. नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न करायला हवेत. हा उपक्रम वर्षभर राबवायला हवा. तरच काही वर्षांमध्ये नदी स्वच्छतेला प्रोत्साहन मिळेल. अन्यथा भविष्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.’’