पिंपरी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा आसमंत दणाणणाऱ्या जयघोषात, ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात, मंगलमय वातावरणात उद्योगनगरीतील लाडक्या गणरायाला निरोप दिला. वरुणाभिषेकाने गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. चिंचवडमध्ये १२, तर पिंपरीत ११ तासांच्या आनंद सोहळ्याने गणरायाला निरोप देण्यात आला. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, गुलालाऐवजी फुलांची उधळण, पारंपरिक वाद्यांचा वापर हे यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते. उद्योगनगरीत गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पिंपरी आणि चिंचवड अशा दोन प्रमुख मिरवणुका असतात. शहरातील इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी आणि गणेश तलाव अशा विविध भागांतील ३४ ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय महापालिकेनेकेली होती. अग्निशामक दल, वैद्यकीय आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी नदीघाटावर तैनात होेते. नदी घाटावर सीसीटीव्हीची नजर असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. पवना नदीघाटावर सकाळी सातपासून घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात येत असल्याचे दिसून आले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि दुपारी एकपर्यंत भुरभुर सुरू होती. एकनंतर पावसाचा जोर वाढला. पाऊस असतानाही गणेशभक्तांचा उत्साह तसूरभरही कमी झालेला नव्हता. पिंपरी आणि चिंचवड अशा दोन भागांतील मिरवणुक प्रमुख असून, त्या ठिकाणी स्वागत कक्ष उभारला होता. पिंपरीतील कराची चौकात आणि चिंचवड येथ़ील क्रांतिवीर चापेकर चौकात कक्ष उभारला होता. चिंचवड येथील मिरवणुकीची सुरुवात दुपारी अडीचला झाली. चिंचवडगावातील मोरया मंडळाचा पहिला गणपती चौकात आला. पिंपरीतील मिरवणुकीची सुरुवात पावणेएकला झाली. साडेतीनपर्यंत १५ गणेशोत्सव मंडळांनी गणरायला निरोप दिला. सायंकाळी सातपर्यंत मिरवणुकीत गणेश मंडळे येण्याचा वेग मंदावला होता. चिंचवडमध्ये केवळ १५ मंडळे चौकातून विसर्जन घाटावर मार्गस्थ झाली होती. याउलट पिंपरीत मंडळांची संख्या अधिक होती. चापेकर चौकातून वाल्हेकरवाडी जकात नाका, थेरगाव विसर्जन या रस्त्यावर बॅरिकेड्स लावलेले होते, तर पिंपरीतील मिरवणुकीत शगुन चौकातून लिंक रस्त्याने पवना नदीतीरावर मंडळे जात होती. पिंपरीत मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांनी गणेशभक्तांची सेवा केली. अल्पोपाहार, चहा, पिण्याचे पाण्याचे वाटप केले. पिंपरीतील मिरवणुकीत डीजेसह पारंपरिक वाद्यांचाही वापर अधिक होता. भंडारा आणि फुलांची उधळण केली जात होती. वाहतूक पोलिसांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले होते. त्यामुळे कोठेही वाहतूककोंडी झाली नाही.चिंचवडला रात्री आठनंतर मिरवणुकीला रंग भरू लागला. मिरवणूक पाहण्यासाठी चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. गणेशभक्त मिरवणुकीची छायाचित्रे मोबाइलमध्येटिपण्यात दंग होते. ढोल-ताशांची पथके आणि चित्तथरारक प्रात्यक्षिके हे चिंचवडच्या मिरवणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. रात्री दहानंतर चापेकर चौकात मंडळांची मोठ्या रांगा लागल्या होत्या. शिस्तबद्धपणे मंडळे आपली मिरवणूक घेऊन पुढे सरकत होते. मंडळांचा दणदणाट सुरू होता. रात्री बाराच्या ठोक्याला दणदणाट थांबला. पोलिसांनी आवाहन करताच मंडळांनी वाद्यवादन बंद केले. मूर्तिदानास प्रतिसाद, निर्माल्यदान संस्कार प्रतिष्ठानाच्या वतीने दान मूर्ती स्वीकारण्यात येत होत्या. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय-पिंपरी, आयपीएसआर कॉलेज-पिंपरी, पोलीस मित्र संघटना, पोलीस नागरिक मित्र संघटनेचे कार्यकर्ते मिरवणुकीसाठी सुरक्षारक्षक म्हणून मदत करीत होते. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे पथकही तैनात होते. अग्निशामक दलाचे कर्मचारी नदीपात्रात सज्ज होते. आरोग्य विभागाचे कर्मचारी मिरवणूक मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करीत होते. जीवरक्षकही तैनात होते. मूर्तिदानावरून वादावादीचिंचवड घाटावर संस्कार प्रतिष्ठानाच्या वतीने दान केलेल्या मूर्ती स्वीकारण्याचे काम सुरू होते, तर ‘सनातन’चे कार्यकर्ते नदीतच मूर्ती विसर्जित करा, असे आवाहन करीत होते. मात्र, या वेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी दोन्ही संघटनांना शांत केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच पालिका कर्मचारीही मंडळाच्या कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देऊन विसर्जन घाटावर शिस्त ठेवताना दिसत होते. गुलालविरहित फुलांची उधळणपिंपरीतील मिरवणुकीत डीजेचा वापर आणि पारंपरिक वाद्यांचा वापर झाला. भंडाऱ्याचा वापरकाही मंडळांनी केला, तर चिंचवडच्या मिरवणुकीत फुलांची उधळण करण्यात आली. मिरवणुकीत महिला आणि तरुणांचा सहभाग अधिक होता. गांधी टोपी, नेहरू शर्ट, पायजमा अशा पारंपरिक वेशात मंडळाचे कार्यकर्ते दिसत होते. गणेश मंडळांनी पौराणिक हलते देखावे सादर केले होते. प्रबोधनात्मक जिवंत देखावे आणि फुलांची आरास, रोषणाईचे रथ लक्ष वेधून घेत होते.
चिंचवडला १२, पिंपरीत ११ तास मिरवणूक
By admin | Published: September 17, 2016 1:17 AM