पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील एकाच इमारतीत तीन कार्यालये चोरट्यांनी फोडली. हा प्रकार गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. उपनिरिक्षक रवींद्र बागुल यांनी दिलेली माहिती अशी : चिंचवड स्टेशन येथे रेल्वे मालधक्क्याशेजारी गुलनूर बिल्डिंग नावाची दुमजली इमारत आहे. यामध्ये विविध कार्यालये आहेत. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ कार्यालय, तसेच दुकाने व संस्था परवाना विभागाच्या कार्यालयासह तीन कार्यालये चोरट्यांनी फोडली. कार्यालयाच्या दरवाजांचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी कपाटे उचकटून कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. सकाळी नऊ वाजता कार्यालयातील कर्मचारी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत तिन्ही कार्यालयांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार अर्ज दिले आहेत. कोणत्याही वस्तू चोरीला गेले नाही, असे त्यांचे म्हणणे असल्याचे बागुल म्हणाले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान परिसरामध्ये घरफोड्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आता चोरट्यांनी सरकारी कार्यालयेही लक्ष्य केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)
चिंचवडला तीन कार्यालये फोडली
By admin | Published: December 26, 2014 4:54 AM