पिंपरी : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीत कार्यकर्ते व नेत्यांकडून गोपनीयतेचा भंग झाल्याची माहिती समोर आली आहे. मतदान हे गुपित असते. मात्र, राजकीय कार्यकर्त्यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान राजकीय पदाधिकारी यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनवर मतदान केल्याचा फोटो काढून शेअर केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअरदेखील केला आहे. गोपनीयतेचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चिंचवड मतदारसंघासाठी ५१० केंद्रावर मतदान प्रक्रिया झाली. यासाठी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तसेच मतदान प्रक्रिया संदर्भातील मार्गदर्शक सूचनाही मतदान केंद्राच्या बाहेर लावण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही शहरातील विविध मतदान केंद्रावर मतदारांकडून गोपनीयतेच्या नियमाचा भंग करण्यात आला. मतदान केंद्रावर मोबाइल किंवा अन्य कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास प्रतिबंध असतानाही येथील मतदान केंद्रावर मतदारानी मोबाइल घेऊन मतदानाचा व्हिडीओ तयार केला व तो सोशल मीडियावर व्हायरल केला.