पिंपरी :चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. यामध्ये ५०.४७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर महिलांनी या निवडणुकीत मतदानासाठी अनास्था दाखविली. एकूण महिला मतदारांपैकी अवघ्या ४८ टक्के महिलांनीच घराबाहेर पडत मतदान केंद्रावर मतदान केले. राष्ट्रीय कर्तव्याचा मूलभूत अधिकार असतानाही महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चिंचवडमध्ये दिसून आले. टक्का घसरण्याची नेमकी काय कारणे आहेत, याचा शोध विविध पक्षांचे पदाधिकारी घेत आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. त्यामध्ये ३ लाख २ हजार ९४६ पुरुष आहेत, तर २ लाख ६५ हजार ९७४ महिला आहेत, तसेच ३४ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. पोटनिवडणुकीत २ लाख ८७ हजार ४७९ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये १ लाख ५७ हजार ८२० पुरुष मतदारांनी मतदान केले, तर १ लाख २९ हजार ३२१ महिला मतदारांनी मतदान केले. उर्वरित १ लाख ३६ हजार ६५३ महिला मतदान करण्यासाठी घराबाहेरच पडल्या नसल्याचे समोर आले आहे.
महिलांची मतदानासाठी कमी झालेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून नाना काटे व बंडखोर अपक्ष राहुल कलाटे यांचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये एकमेव महिला उमेदवार असल्याने महिलांचा मतदानाचा टक्का वाढणार असल्याचा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीनंतर फक्त ४८ टक्के महिलांनीच मतदान केले असल्याचे समोर आले आहे, तर त्या तुलनेत पुरुषांनी जास्त मतदान केले असून, त्यांच्या मतदानाची टक्केवारी ५२.१ इतकी आहे. महिलांचा घटलेला टक्का निर्णायक ठरणार असून, तो कोणाला यशापर्यंत खेचणार याची उत्सुकता आहे.
महिला पदाधिकाऱ्यांना काय वाटते?
यावेळी अश्विनी जगताप यांच्या पाठीशी पुरुष मतदार भावाप्रमाणे उभे आहेत. हे मतदानामधून दाखवून द्यायचे होते. त्यामुळे जास्तीतजास्त पुरुषांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन आम्ही केले होते. त्याला पुरुष मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला, तसेच महिला मतदारांचीही आकडेवारी चांगली आहे.
- उमा खापरे, आमदार.
महिलांना अजूनही दुय्यम स्थान आहे. मतदानाच्या बाबतीत प्रचारातही त्यांना तेवढा सन्मान दिला जात नाही. आता राज्यातील वातावरण पूर्णत: दूषित आहे. त्यामुळे या राजकारणाचा तिरस्कार महिलांमध्ये जास्त आहे. त्यामुळे महिला मतदानासाठी कमी प्रमाणात बाहेर पडल्या. महिला या प्रामाणिकपणे मतदान करत असतात. त्यांची टक्केवारी कमी झाल्याने निकालामध्ये गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- सुलभा उबाळे, ठाकरे गट.
प्रचारादरम्यान भाजपने जो भ्रष्टाचार केला आहे, त्याबाबत महिलांमध्ये मोठी चीड दिसत होती. तसेच वाढती महागाई, बेरोजगारी यावर पोटतिडकीने महिला बोलत होत्या. त्या मतदानासाठी कमी प्रमाणात बाहेर पडल्या आहेत. मात्र, निकालावर त्याचा फारसा काही परिणाम होणार नाही, असे वाटत आहे.
- कविता आल्हाट, महिला शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस