पुणे : चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी चालवली आहे. त्यानुसार चिंचवडमधील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असून, कसब्यात मात्र निवडणूक होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसने तर कसब्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखतीही घेतल्या. भाजप मात्र अजून संभ्रमातच दिसत आहे.
काँग्रेसमध्ये यांच्या झाल्या मुलाखती
राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, पुण्याचे प्रभारी तथा आमदार संग्राम थोपटे श्रीनगरला गेले आहेत. त्यांनी तिथून फोन करून इच्छुकांना काँग्रेस भवनात बोलावले. तिथूनच त्यांची ऑनलाइन मुलाखत घेतली. यात माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी तसेच स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष नीता परदेशी यांनी मुलाखती दिल्या. थोपटे व शिंदे यांनी त्यांना प्रश्न विचारले व उमेदवारी करण्याच्या तयारीची माहिती घेतली.
बिनविरोधसाठी भाजपची लेटर पॉलिसी
कसब्यातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप अजूनही प्रयत्नशील आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक या लोकमान्य टिळक यांचा वारसा समर्थपणे चालवत होत्या. त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राची विशेष परंपरा असून, त्याचे पालन भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीत केले. काँग्रेसचे राजीव सातव यांच्या निधनानंतर तिथेही याचे पालन केले. त्यामुळे आता कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती त्या पत्रात केली आहे.
भाजपमधील इच्छुकही घोड्यावर
निवडणूक बिनविराेध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक तसेच प्रदेशच्या नेत्यांबरोबर बोलण्याची जबाबदारी भाजपने आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर सोपवली आहे. असे असले तरी उमेदवारी कोणाला? याबाबत पक्षात संभ्रम दिसतो. तिथेही इच्छुकांची संख्या मोठी असून सगळेच घोड्यावर आहेत. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहेच, त्याशिवाय स्थायी समितीचे माजी सभापती हेमंत रासने, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, धीरज घाटे यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे. कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत त्यामुळेच पक्षनेतृत्वही संभ्रमात सापडले आहे.