- विश्वास मोरे
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील स्पष्ट, कणखर, जिद्दी, ध्येयवादी, तसेच आदरयुक्त दबदबा असणारे नेतृत्व म्हणजे आमदार लक्ष्मण जगताप आज अनंतात विलीन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस असो की भाजपा, ते ज्या पक्षात असतील तिथे अत्यंत जीव ओतून काम करणारे नेतृत्व ही त्यांची ओळख असायची. कोणतीही गोष्ट अगदी ‘डंके की चोटपर’ करण्याची त्यांच्यात धमक होती. जगतापांचे अकाली जाणे भाजपाच्या दृष्टीने चिंचवडसह शहराची मोठी हानी आहे. चिंचवड भाजपाची धुरा भाऊ शंकर जगताप की पत्नी अश्विनी जगताप यांच्यापैकी कोण सांभाळणार ? याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे.
पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील स्थानिक दमदार आमदार म्हणून लक्ष्मण जगताप यांच्याकडे पाहिले जायचे. १९८६ मध्ये प्रथम नगरसेवक झाले. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष, महापौर ते आमदार असा त्यांचा चढता राजकीय आलेख आहे. २०१४ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून त्यांनी प्रतिस्पर्धी श्रीरंग बारणे यांना कडवी झुंज दिली. त्यानंतर काळाची राजकीय समीकरणे ओळखत त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. २०१४ ला आणि २०१९ ला चिंचवड विधानसभेतून निवडणूक जिंकली. अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेवर २०१७ ला भाजपाचा झेंडा फडकाविण्यात त्यांचे योगदान मोठे होते. २०१७ पूर्वी शहरात भाजपचे तीन नगरसेवक होते. आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही संख्या ७७ होऊन एकहाती सत्ता महापालिकेत आली.