पुणे : कोरोना विषाणूने चीनमध्ये हाहाकार माजवलेला असतानाच दिल्लीहून पुण्याला येणारे विमानही याच कारणामुळे हादरुन गेले. निमित्त झाले ते विमानात उलटी केलेल्या प्रवाशाचे. पण हा प्रवासी चिनी असल्यामुळे त्याच्या उलटीकडे ‘कोरोना’च्या संशयावरून पाहिले जात असून, त्याला विमान पुण्यात उतरताच नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चीनमधील वुहान प्रांतातून या विषाणूचा प्रसार झाला. भारतात हा विषाणू पसरू नये, यासाठी विमानतळावर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतून पुण्याला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका चीनी प्रवाशाला उलट्यांचा त्रास झाला. सकाळी सात वाजता पुण्यात येणारे विमान साडेसात वाजता पुण्यात पोहेचले. हे विमान पुन्हा लगेच दिल्लीला उड्डाण करणार होते. परंतु प्रवाशाने विमानातच उलटी केल्याने खबरदारी म्हणून जंतुनाशकाद्वारे विमानाची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे सकाळी पावणे आठच्या सुमारास दिल्लीकडे जाणारे हे विमान दुपारी २ वाजून २४ मिनीटांनी दिल्लीच्या दिशेने हवेत झेपावले.
दरम्यान, चिनी प्रवाशाच्या अस्वस्थतेबाबात वैमानिकाने विमानतळ प्रशासनाला कळवले होते. त्यामुळे विमान पुण्यात उतरण्याआधीच डॉक्टरांची टीम लोहगाव विमानतळावर तैनात करण्यात आली होती. विमान उतरल्यानंतर तातडीने उलटी करणाºया चिनी प्रवाशाला तातडीने नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या प्रवाशाच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचबरोबर विमानातील इतर प्रवाशांना काही त्रास झाला नाही ना, याची खबरदारी घेण्यात आल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.