सतीश सांगळे
कळस : इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथील राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी चिंकारा लोकअभयवन प्रकल्पाला ग्रहण लागले आहे. येथील सुमारे पंधराशे हेक्टर वनक्षेत्रात असणारी वनसंपदा वृक्ष विरळ झाले आहेत. पर्यटनवाढीच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात पर्यटक कमी अन् शिकारीच जास्त, असे चित्र सध्या आहे. महत्त्वाचे म्हणजे वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मतदारसंघात हे अभयारण्य आहे. असे असतानाही या अभयारण्याचा ना विकास झाला ना शिकारी कमी झाले.
तालुक्यातील मोठा गाजावाजा करून अस्तित्वात आलेला मौजे कडबनवाडी, व्याहळी, कौठळी व रुई या गावाची भौगोलिक सीमा व वनक्षेत्रात सुमारे १५०० हेक्टरमध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र, नवलाईचे नऊ दिवस गेल्यानंतर या प्रकल्पासाठी फारसी कोणी तसदी घेतली नाही. या प्रकल्पाला ज्याचे नाव दिले त्या चिंकाराचीच सहा महिन्यांत एकदा तरी शिकार होत आहे. शनिवारी सकाळी येथील वनक्षेत्रात दोन चिंकारा हरणांची बंदुकीतून गोळ्या घालून शिकार झाली. पुरावा हाती लागू नये म्हणून या मारलेल्या हरणांना शिकारी मोटारीत घालून शिकाऱ्यांनी नेले. या घटनेमुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. चिंकारा या दुर्मिळ हरणांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते. ही संख्या सुमारे १००० पेक्षाही जास्त होती. मात्र, मानवी वावर, उजाड माळरान, पाणी व खाण्याची असुविधा यामुळे ही संख्या कमालीची घटून ३०० च्या आसपास आली आहे. या ठिकाणी चाळीसच्या आसपास असणारे लांडगे केवळ चार ते पाच दिसत आहेत. अभयारण्यात असलेले ससे, गरूड, खोकड, सर्प यांचेही प्रमाण खूपच कमी झाले आहे. चिंकाराला कित्येकदा रस्ता ओलांडताना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. या ठिकाणी पर्यटकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्ती नाही. चार बोअर घेऊन सोलरपंप बसविले. मात्र ते बंद आहेत. काहींची तर देखभाल दुरुस्ती देखील करण्यात आलेली नाही. वन्यप्राण्यांना खाण्यासाठीही भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे यामध्ये शिकार वाढत आहे. पर्यटकांना वनविहार करण्यासाठी सायकली घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या धूळ खात पडलेल्या आहेत. यामधील काही सायकलीही चोरीला गेल्या आहेत. वनविभाग या सर्व गोष्टींकडे बघण्याची तसदी घेत नाही.
चौकट
या ठिकाणी चिंकारा बचावासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. सुमारे एक हजाराच्या आसपास असणारी चिंकारा संख्या कमालीची घटली आहे. शिकारीचे प्रमाण वाढले आहे. शिकारीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. वनविभागाने रात्रीची गस्त वाढवून ठोस उपाययोजना करायला हव्यात.
- भजनदास पवार, प्रमुख, चिंकारा बचाव अभियान
----
कोट
तालुक्यातील चिंकारा शिकारीच्या संबंधितप्रकरणी अधिकाऱ्यांना तपासाबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये कसून चौकशी केली जाईल. याप्रकरणी काही तथ्य आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल.
- दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री वनविभाग
तालुक्यात वन्यजीव व चिंकारा हरणांची मोठी संख्या होती. मात्र प्रशासनावर वचक राहिला नसल्याने संख्या खूप कमी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने गस्त वाढवली पाहिजे व कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. -
हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री