लोणी काळभोर : हिंदू धर्माच्या नववर्षातील पहिला दिवस गुढीपाडव्याचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीस सालाबादच्या परंपरेप्रमाणे भरजरी वस्त्रालंकार घालण्यात आल्याने श्रींचे रूप मोहक दिसत होते. दर्शनासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास श्रींचे वंशपरंपरागत पुजारी चेतन आगलावे यांनी महापूजा व अभिषेक केला. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे व व्यवस्थापक मंगलमूर्ती पोफळे यांच्या उपस्थितीत मोरेश्वर पेंडसे यांनी पूजा केली. दुपारी श्रींना जरतारी पितांबर, उपरणे आदी भरजरी महावस्त्रे घालण्यात आली. ऋद्धीसिद्धीची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली.चिंतामणीस मुगुट, हार, शुंडा, नाग, मोर, पोवळे, आदी रत्नजडित अलंकारासमवेत रुद्राक्षमाळा, यांचबरोबर तीन शेर वजनाची गाठी घालण्यात आल्याने अगोदरच सर्वांगसुंदर असलेल्या श्रींच्या सौंदर्यात आणखी भर पडली.गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून अनेक जण मोठी खरेदी करतात. त्यांत दुचाकी, चारचाकी गाड्यांचा समावेश असतो. अशा नवीन खरेदी केलेल्या गाड्यांची पहिली पूजा करण्यासाठी अनेक गाडीमालकांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने गर्दीत वाढ झाल्याचे जाणवत होते. (वार्ताहर)
चिंतामणीस भरजरी वस्त्रालंकार
By admin | Published: March 31, 2017 2:24 AM