पुणे: कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पुरानं हाहाकार उडाला. अशावेळी संसार उद्धवस्त झालेल्या नागरिकांना मदतीची गरज भासतेय. याचा विचार करुन अगदी पहिल्याच दिवसापासून 'युथ फॉर डेमॉक्रसी' या तरुणांच्या ग्रुपनं मदतीचा हात दिलाय.
राज्यपातळीवर विविध उपक्रमात हिरिरीनं सहभागी होणारा हा ग्रुप मदतीसाठी सुध्दा तितक्याच ताकदीनं उभा राहिलाय. जीवनावश्यक वस्तुंच्या किट सह अंथरुण - पांघरुणापर्यंतच्या वस्तू त्यांनी चिपळूणला पोहोच देखील केल्यात. शासकीय यंत्रणेच्या आधी 'युथ फॉर डेमॉक्रसी'च्या सदस्यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिल्याची विशेष बाब यातून दिसून येत आहे.
व्हॉटसअप ग्रुपवर आवाहन केल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये युथ फॉर डेमॉक्रसीने मदत केंद्र उभे केले. ज्या केंद्रावर या किट्स पोहोच करण्यास सोपं जाईल. त्यातून पुणे, ठाणे, मुंबई पासून ते अगदी मराठवाड्यातले अनेक जिल्हे अशा सर्वच ठिकाणी या किट्स गोळा करण्यात येत आहेत. पहिल्या दिवशी आवाहनानंतर ३०० किट्स आणि तीन हजार पाण्याच्या बाटल्या पोहोचविण्यात आल्या.
अजुनही किट तयार करण्याचं काम अगदी जोरात सुरुये. जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ जसं की, सुका मेवा, फरसाण, वेफर्स, बिस्कीट, खजूर तसंच कुटुंबातल्या महिला आणि पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची वस्त्रे, जीवनावश्यक वस्तू, अंथरूण-पांघरुण देण्यासाठी युथ फॉर डेमॉक्रसीने मदतीची हाक दिलीये.
पुण्यातून राहुल कराळे, दिनेश जगताप, रणजित देशमुख, प्रतिक पाटील, गणेश कापसे, राज बांदल, भूषण राऊत तर पिंपरीतून प्रविण गाढवे, आदित्य वाजगे, डॉ.जयपाल गोरडे, निरंजन माने, जुबेर नाईकवाडी आदी टीम कार्यरत आहे. पुणेकरांनी जास्ती जास्त मदत करण्याचे आवाहन टीमच्या सदस्यांनी केले आहे.