केडगाव : दैव बलवत्तर म्हणून युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडलो. अजून केडगावला (ता. दौंड) घरी येण्यासाठी ५ दिवस लागणार असले तरी धोका टळला आहे अशी प्रतिक्रिया केडगाव येथील तेजस दिनेश मोहिते या विद्यार्थ्याने केली. तेजस मोहिते हा युक्रेनमधील जाफरोशिया शहरांमध्ये शिक्षण घेत आहे. हे शहर रशियन सैनिकाच्या हिटलिस्टवर होते. प्रसंगावधान राखत तेजस सह जवळपास १५०० विद्यार्थ्यांनी २४ फेब्रुवारी रोजी युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतला.
सुरक्षेसाठी तीन दिवस हे विद्यार्थी एका बंकर मध्ये लपून बसले होते. यावेळी मोबाईल बंद असल्याने बाहेरील जगाशी कसलाही संपर्क होत नव्हता. चिप्स, बिस्किट व पाण्यावरती दिवस काढत होते. काही दिवस पायी, बसने व ट्रेनने प्रवास करत हे विद्यार्थी दिनांक २ रोजी युक्रेन व हंगेरी देशाच्या सीमेवरती दाखल झाले. यानंतर हंगेरीमध्ये त्यांना १४ दिवसाचा पासपोर्ट मिळणार असून हंगेरीत प्रवेश केल्यानंतर त्यांचे मोबाईल मधील सिम बंद झाले.
हंगेरीत पोहोचण्यापूर्वी शेवटचा व्हिडिओ कॉल तेजसने आपली आई डॉ. वंदना मोहिते यांच्याशी केला मी सुखरूप आहे काही काळजी करू नकोस. आगामी दोन-तीन दिवसांमध्ये विमानाने आम्ही भारतात परतणार असल्याचे त्याने सांगितले. भारतीय चलन नुसार पैसे पाठवण्याची विनंती केली. यावेळी त्याच्यासोबत अनेक भारतीय विद्यार्थी होते. यासंदर्भात तेजसची आई डॉ. वंदना मोहिते म्हणाले की, सर्वांच्या प्रयत्नाने भारतीय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका झाली आहे. तेजस जेव्हा केडगाव मध्ये परत येईल तो माझ्या दृष्टीने आनंदाचा क्षण असेल. असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.