शरद जाधव, ऑनलाइन लोकमत
भिलवडी, दि. ६ - महाराष्ट्र शासनाच्या एकच लक्ष दोन कोटी वृक्ष या अभियानास साद घालित सर्वत्र वृक्षारोपण मोठया उत्साहात संपन्न झाले.मात्र खरी गरज आहे ती या वृक्षाचे संगोपन करण्याची,त्याची निगा राखण्याची .भिलवडीस्टेशन ता.पलूस,जि.सांगली येथील मे.बी.जी.चितळे समूहाने झाडांच्या संगोपनासाठी मोबाईल अॅप तयार केले आहे.वनमहोत्सव सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी चितळे समूहाचे वतीने भिलवडी परिवरातील विविध गावांमध्ये ७२७ रोपांची लागवड करून या मोहिमेचा शुभारंभ केला.
भिलवडी शिक्षण संस्थेचे बाबासाहेब चितळे महाविदयालय,सेकंडरी स्कूल भिलवडी,भिलवडी रेल्वेस्टेशन परिसर,भिलवडी स्टेशन येथील डेअरी परिसर,बुरूंगवाडी येथील ब्रह्मानंद विदयालय,जायंटस् ग्रुप भिलवडी, आदी ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली.पलूस येथील प्रकल्पग्रस्तांच्या आंबेघर वसाहतीत पलूस तालुका पंचायत समितीच्याअंपग समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने अपंग मुलांच्या हस्ते दोनशे आंब्यांच्या झाडांची लागवड करण्यात आली.
उदयोगपती नानासाहेब चितळे,काकासाहेब चितळे, श्रीपाद चितळे,विश्वास चितळे,अनंत चितळे,गिरिश चितळे,मकरंद चितळे आदी संचालक व कर्मचारी वृंद या मोहिमेत सहभागी झाले. सदर वृक्षारोपण केलेली झाडे व त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाला देण्यात आली आहे.
वृक्षवाढीच्या नोंदी अचूक व सातत्याने ठेवण्यासाठी मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे.हे अॅप इतर वृक्षप्रेमींना गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.आपण संवर्धन करित असलेल्या वृक्षांची माहिती दर महिन्याला अदयावत करणा-यांना पॉँईटस् मिळणार असून सहभागी झालेल्या दुकानामध्ये रिडीम करण्याची सोय असेल.