पुणे : आरोग्य विभागाच्या ( health department) परीक्षा मागील महिन्यात होणार होत्या. पण त्यावेळेस झालेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षांचा घोळ काही कमी होत नाहीये. आताही हॉलतिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे या अडचणींचा उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारच्या या चुकीवर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे.
''मुख्यमंत्री कालच्या भाषणात गोंधळलेले दिसले. तीच परंपरा प्रशासनानं सुरू ठेवली आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर हे सरकार सरकार सलग दुसऱ्यांदा आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात नापास झालंय. हा भोंगळ कारभार असून हे गोंधळी सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. सरकारी चुकीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही असा आरोप करत त्यांना पुन्हा संधी द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.''
''मुख्यमंत्री म्हणालेत कि मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडीलांचं स्वप्न पूर्ण केलंय. दोनदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झालाय. साहेब राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडीलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री यांना दिला आहे.''
आरोग्य भरतीच्या पेपरमधल्या आयोजनात पुन्हा मोठा गोंधळ झाला आहे. या परीक्षामध्ये दोन सत्रात पेपर असल्याने उमेदवारांना सकाळी एका जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसमोर परीक्षेबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पदासाठी परीक्षा फी भरण्यात आली नसतानादेखील चक्क त्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट प्राप्त झाले आहे. उमेदवारांना केंद्र निवडण्याचा अधिकार असताना, जे केंद्र उमेदवारांनी निवडली आहेत, ते केंद्र न देता दुसरे लांबचे केंद्र कंपनीच्या वतीने देण्यात आले असून, कंपनीला कोणी अधिकार दिला आहे असे परस्पर केंद्र बदलण्याचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उमेदवारांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी
उमेदवारांनी 2 परीक्षासाठी फी भरली असून त्यांना जी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे, ती देखील संधी ह्या कंपनीच्या चुकीच्या व्यवस्थापनेमुळे डावलली जाणार आहे. सकाळी एका जिल्ह्यात पेपर आणि दुसरा पेपर त्यात जिल्ह्यात देणे अपेक्षित असताना दुसरा जिल्ह्यात केंद्र देण्यात आले असून परीक्षेची संधी हिरावून घेण्याचा प्रकार हा कंपनीद्वारे करण्यात आला असून उमेदवारांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी केल्याचे निष्पन्न होत आहे.
परीक्षा आयोजनामधील गोंधळ समोर
एकाच उमेदवाराची एकाच पदासाठी परीक्षा देण्यासाठी त्याची 2 जिल्ह्यात नावे आली आहेत, तसेच वेळ देखील एकच देण्यात आली आहे. एका पदासाठी 430 रुपये फी आकारण्यात आली असता, दोन पदासाठी 860 रुपये खात्यातून डेबिट झाले असता, ज्या पदासाठी अर्ज केला नाही, तसेच फी देखील भरण्यात आली नाही, अशा उमेदवारास हॉलतिकीट आले आहे. यावरून परीक्षा आयोजनामधील गोंधळ समोर आला आहे.