पुणे - दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी काल ६ दहशतवाद्यांना अटक केली. प्राथमिक तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात आणखी दहशतवादी असणाऱ्याची शक्यता तपाय यंत्रणांनी वर्तवली आहे. यावरुनही आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या टीकेवरुन आता राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
दिल्ली पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. त्यानुसार त्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारवर यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. "आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यानंतर, आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर प्रहार केला आहे.
चित्राताईंना महाराष्ट्रद्वेषाने एवढं पछाडलं आहे की, दहशतवादी दिल्लीत पकडले असतानाही महाराष्ट्रात पकडल्याचं सांगत आहेत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या टॉपर आहेत ताई, आता बदामाचा खुराक सुरू करा, म्हणजे बुद्धीला चढलेला गंज कमी होईल, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
"दिल्ली पोलीस येऊन मुंबईतील आतंकवादी पकडताहेत मग आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का??" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्लीत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनंतर स्वत: दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना थेट मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तांसोबत बैठक सुरू असून चौकशीत त्यांना मिळालेली माहिती ते मुंबईच्या आयुक्तांना देत आहेत.
संजय राऊतांवरही साधला होता निशाणा
"संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील स्त्रीबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृतीचं हे उदाहरण आहे. अहो राऊत. एका महिलेवरती अमानवीय अत्याचार झालेला आहे. त्यामुळे तिचा ज्या यातनेने मृत्यू झाला असेल. तुम्हाला ते या जन्मातही समजणार नाही. अशा दुर्दैवी घटनेवरती राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तिचा वापर करता आणि महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशची तुलना करता. नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झालेला आहे. फक्त भावनिक गप्पा झोडायच्या आणि मग घटनेनंतर म्हणायचे…ताई, घाबरू नका.. चिंता करू नका…हल्लेखोरांना शिक्षा होईल... आणि फक्त अशी भावनिक भुरळ घालायची...असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.