पुणे : आपल्या वाहनांना लकी नंबर मिळावा म्हणून एक हजार रुपयांपासून अगदी लाखोंच्या घरात फी भरल्याची अनेक उदाहरणे शहरात आहेत. स्वत:ला भाई, दादा, भाऊ, युवा नेता म्हणून मिरवून घेणाऱ्यांचे प्रमाण यात सर्वाधिक आहे. मात्र आता लकी नंबरची ही क्रेझ वकिलांमध्ये देखील वाढत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रक्टीस करताना वकील बऱ्याचदा कोणत्याही एका प्रकारच्या केसेस घेत असतात. गुन्हेगारी, जमिनीचे वाद, कौटुंबिक हिंसाचार हे त्यातील काही महत्त्वाचे दावे. त्यामुळे त्या प्रकारचे खटले घेणारे वकील त्यांच्या वाहन आणि मोबाइलसाठी गुन्ह्याच्या कलमांप्रमाणे लकी नंबर चॉईस करीत आहे. या सर्वांत ३०२ हा नंबर अनेक वकिलांच्या वाहनांवर दिसत आहे. तसेच मोबाइलचे शेवटचे आकडे देखील ३०२ असे आहेत. या लकी नंबरसाठी वकील हजारो रु पये मोजण्यासाठी तयार असतात. खूनाच्या प्रकरणात ३०२ हे कलम वापरण्यात येते. गेल्या काही दिवसांत शहरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. क्षुल्लक कारणांवरून खून झाल्याचे प्रकार शहरात घडत आहे. त्यामुळे ३०२ या कलमाखाली प्रकरणे वाढत असल्याचे या नंबरला पसंती असल्याचे एका वकिलाने सांगितले. तर खूनाच्या खटल्यांचे कामकाज पाहणारे वकील म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी. तसेच आपल्या गाडीचा नंबर सर्वांना सहज लक्षात रहावा म्हणून देखील हा नंबर निवडला जात आहे. भारतीय संविधानातील हे एक महत्त्वाचे कलम आहे. त्यामुळे या कलमाविषय प्रॅक्टीस करणारे वकील म्हणून आपली ओळख निर्माण व्हावी. तसेच इतर वकिलांना लक्षात राहावे, म्हणून मी माझ्या दुचाकीसाठी ३०२ हा नंबर चॉईस केला. तसेच माझ्या मोबाइलनंबरचे शेवटचे आकडे देखील ३०२ आहे, अशी माहिती अॅड. जयपाल पाटील यांनी दिली. ................................... चारचाकीसाठी ५० हजार फी पुणे आरटीओमध्ये १ नंबरसाठी एका महागड्या गाडीच्या मालकाने तब्बल १२ लाख रुपये फी भरली आहे. तर दुचाकीसाठी ३०२ हवा असेल तर ५ हजार आणि चारचाकीसाठी या नंबरची फी म्हणून सुमारे ५० हजार रुपये आकारले जात आहेत. असे असतानाही शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात अनेक वाहनांना हा नंबर पाहायला मिळत आहे.
वकिलांच्या वाहनांवर झळकताय कलमांचे चॉइस नंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 4:14 PM
दुचाकीसाठी ३०२ हवा असेल तर ५ हजार आणि चारचाकीसाठी या नंबरची फी म्हणून सुमारे ५० हजार रुपये आकारले जात आहेत.
ठळक मुद्दे३०२ नंबरच्या अनेक गाड्या : मोबाइल नंबरचे शेवटचे आकडेही आहेत सेम