पुणे : ख्रिस्ती समाजाला दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत राजकीय प्रतिनिधित्व मिळायला हवे. आजपर्यंत सगळेच राजकीय पक्ष ख्रिस्ती समाजाला गृहीत धरून चालले, यापुढे मात्र आम्हाला राजकीय भूमिका घेऊन काम करावे लागेल, असा इशारा प्रादेशिक ख्रिश्चन सोसायटीने आयोजित केलेल्या पाचव्या ख्रिस्ती हक्क परिषदेने दिला.
बिशप थॉमस डॉबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डाबरे म्हणाले, ख्रिस्ती समाजाने आजपर्यंत कधीच राजकीय भूमिका घेतली नाही, त्यामुळे त्यांना लोकसंख्येच्या तुलनेत राजकीय व त्यामुळेच नंतर सामाजिक प्रतिनिधित्व मिळाले नाही. अँग्लो इंडियन समाजाला राष्ट्रपतींच्या माध्यमातून संधी देण्यात येते, तर मग ख्रिश्चन समाजाला का नाही ?
संयोजक प्रशांत केदारी यांनी सांगितले, राजकीय प्रतिनिधित्वामध्ये ख्रिश्चनांना संधी मिळावी अशी मागणी करण्यात काहीही गैर नाही. ख्रिस्ती समाजासाठी मदर तेरेसा यांच्या नावाने महामंडळ मिळावे, व अल्पसंख्याक बजेटमध्ये वृद्धी करावी अशा आमच्या अनेक मागण्या आहेत, त्यासाठी राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय पूर्ण होणार नाहीत. याप्रसंगी माजी पोलिस महासंचालक अब्दुल रहमान, प्रवीण गायकवाड, राहुल गायकवाड, अनिल कुटो यांचीही यावेळी भाषणे झाली. परिषदेला विजय बारसे, जमत-ए- इस्लामचे झुबेर मेमन, ख्रिश्चन फोरमचे राजेश केळकर, फादर जो गायकवाड, संजय गायकवाड, सिस्टर आरकेंजळ, युक्रांदचे संदीप बर्वे, ॲड. असुंत पारगे, आदी उपस्थित होते. याप्रसंगी विजय बारसे, स्टेला गाेडे यांचा सत्कार करण्यात आला.