पुणे : ख्रिस्ती बांधवांसह शहरातील विविध चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या उत्सुकतेने भारावलेले वातावरण, या जन्मसोहळ्याच्या तयारीत रममाण झालेले ख्रिस्ती कुटुंबे, धर्मगुरूंसह ख्रिस्ती बांधवांच्या चेहऱ्यावर तरळणारे शुद्ध आनंदाचे भाव यांसह विविध शहरात रात्री विशेष प्रार्थनेने येशू ख्रिस्ताच्या जन्माचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ख्रिस्ती बांधवांनी जन्मानंतर एकमेकांना शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला़ नाताळची पूर्वसंध्या आणि रविवार असा योग साधल्याने दिवसभर शहरात विशेषत: कॅम्पमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़ नाताळ म्हणजे ख्रिस्त जन्माचा सण जगभर साजरा केला जातो. नाताळनिमित्त सर्व चर्चमध्ये बालचमूंसाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मध्यवर्ती भागात प्रसिद्ध चर्च विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. या वेळी सर्व चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील विविध मंडळांनी येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे तयार केले होते. जंगलीमहाराज रस्त्यावर ख्रिस्ती बांधवांनी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री दहा वाजता शहरामधील चर्चमध्ये वॉच नाईट सर्व्हिस या विशेष प्रार्थनेचे आयोजन केले होते.
चर्चना आकर्षक सजावट; धार्मिक कार्यक्रमविमाननगर : प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मसोहळ्यानिमित्त पूर्वसंध्येला विमाननगर, वडगावशेरी, येरवडा परिसरात आकर्षक सजावट, मास प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सैनिकवाडी येथील ख्राईस्ट द किंग चर्च येथे आकर्षक सजावट, रोषणाई व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला येशूख्रिस्तांच्या जन्मसोहळ्यानिमित्त गायनवृंदाने नाताळ सणाची गाणी सादर केली. मुख्य जन्मसोहळ्यात प्रमुख धर्मगुरू फादर लॉरेन्स अल्मिडा यांनी या कार्यक्रमात प्रार्थना (मास) प्रवचन व मार्गदर्शन केले. यानंतर सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नाताळ सणाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. केक व चहापानाने कार्यक्रमाचा समारोप झाला. ख्रिसमसच्या दिवशी (आज) सकाळी आठ ते सव्वानऊ पर्यंत मराठी भाषेत व सव्वानऊ ते सव्वादहा इंग्रजी भाषेत जन्मसोहळ्या निमित्त विशेष प्रार्थना व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.