पुणे : प्रभू येशूचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे केक उपलब्ध झाले आहे. खास नाताळानिमित्त तयार करण्यात आलेल्या प्लम केक, मार्झीपॅन केक आणि ग्वाआ चीजकेकला ख्रिश्चन बांधवांची विशेष पसंती मिळत आहे. गत वर्षांच्या तुलनेत केकच्या मागणीमध्ये यंदा दुप्पट वाढ होणार आहे.ख्रिश्चन बांधवांची आवड निवड लक्षात घेऊन खास नाताळासाठी मागणीनुसार विशिष्ट प्रकारचे विविध केक तयार करण्यात येतात. यामध्ये प्लम केक, मार्झीपॅन केक, ग्वाआ चीजकेकसह सांताक्लॉजची प्रतिकृती, ख्रिसमस ट्री तसेच फ्रेश क्रीम, चॉकलेट ब्राउनी केक, प्लम हनी केक, मिक्स फ्रूट केक, रिअल प्लम, रीच प्लम, स्टार केक, स्टोलन ब्रेडआदींनाही विशेष मागणी राहते. सद्यस्थितीत ब्लॅक फॉरेस्ट केक, मिक्स फ्रूट, वेडिंग, चॉकलेट मड, निव्हर्सरी, थीम केक यांसारखे शंभरावर केकचे प्रकार आॅर्डरनुसार बनवून मिळतात. त्यांची किंमत आकर्षक फ्लेवर्स, वजन तसेच डिझाईननुसार ठरते. ख्रिसमससाठी २७० रुपयांपासून केक उपलब्ध असून प्लमकेकची १ हजार ते १ हजार २०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्यात येत आहे. याखेरीज, शुद्ध शाकाहारींसाठी अंड्याचा वापर न करता तयार केलेले केकही बेकऱ्यांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती विक्रेते अजिंक्य कोळेकर यांनी दिली. खास ख्रिसमससाठी सान्ताक्लॉज, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल अशा स्वरुपामध्ये ही चॉकलेट्स तयार करण्यात आली आहेत. याबरोबरच काही दुकानांमध्ये होम मेड चॉकलेट्सही उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. नाताळासाठी विशेष मागणी असलेल्या प्लम केकमध्ये अनेक प्रकार आढळतात. हा ड्राय केक असून तीन महिन्यांआधी तो रममध्ये भिजवला जातो. रिच प्लम केक हा पूर्णपणे सुक्यामेव्यापासून तयार करण्यात येतो. काजू, किसमिस, अक्रोड, टूटी फ्रुटी यांचा त्यामध्ये भरपूर वापर होतो. संत्र्याचे साल साखरेच्या पाकामध्ये उकळून ते या केकवर बसवले जाते, त्यामुळे केकला वेगळीच चव येते. मार्झीपॅन केक हा नाताळसाठी तयार करण्यात येत असलेला दुसरा महत्त्वाचा प्रकार. त्यातही प्रामुख्याने सुक्यामेव्याचा वापर होतो. त्यात प्रामुख्याने बदामाची पेस्ट आणि साखरेचा पाक असतो. या केकला वेगवेगळ्या प्रकारची चव यावी यासाठी आंबा, स्ट्रॉबेरी, पेरू, कैरी, जांभूळ यांच्या रसाचा वापर करण्यात येतो. ग्वाआ चीज हा जास्त लोकप्रिय प्रकार आहे. हा केक तयार करताना पेरू साखरेच्या पाकात उकळून तयार केलेल्या जेलीचा वापर करण्यात येतो. यासाठी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे नाताळ आणि ईस्टर या सणांच्या वेळीच हा केक तयार करण्यात येत असल्याचे विक्रेते महेश जाधव यांनी सांगितले.
नाताळनिमित्त प्लम, मार्झीपॅन अन् ग्वाआ चीजकेकला विशेष पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 7:43 PM
खास नाताळानिमित्त तयार करण्यात आलेल्या प्लम केक, मार्झीपॅन केक आणि ग्वाआ चीजकेकला ख्रिश्चन बांधवांची विशेष पसंती मिळत आहे.
ठळक मुद्देनाताळासाठी विशेष मागणी असलेल्या प्लम केकमध्ये आढळतात अनेक प्रकार ग्वाआ चीज हा जास्त लोकप्रिय प्रकार, घ्यावी लागते मेहनत