पुणे :हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याने वेटरला मारहाण करून त्याचे अपहरण केले होते. भारती विद्यापीठ पोलिसांनी जेजुरी येथून यातील ५ जणांना अटक केली. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे त्यांच्यावर यापूर्वी खूनाचा गुन्हा दाखल आहे.
योगेश सर्जेराव पारधे (वय २५, रा. कोल्हार, ता. राहुरी), रवींद्र सकाहरी कानडे (वय ४१,रा. कोल्हार, ता. राहुरी), रुपेश अशोक वाडेकर (वय ३८, रा. शिर्डी, ता. रहाता), ओमकार जालिंदर बेंद्रे (वय २३, रा. राशीन, ता. कर्जत), नितीन अशोक वाडेकर (वय ३२, रा. शिर्डी, ता. रहाता, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत ३८ वर्षाच्या हॉटेलमालक महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जांभुळवाडी येथील नवीन बोगद्याजवळील रानमाळ हॉटेलमध्ये सोमवारी रात्री आठ वाजता घडला. या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रानमाळ हॉटेल आहे. आरोपींनी त्यांच्या हॉटेलमध्ये येऊन जेवण केले. त्यांच्या हॉटेलमधील वेटर किशोर कोईराला याने जेवणानंतर त्यांच्याकडे बिलाची मागणी केली. तेव्हा त्यांनी किशोर याला मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या कारमधून जबरदस्तीने अपहरण केले. जाताना त्यांना उद्या तुम्हाला त्याची मरणाची खबर येईल, असे सांगून ते निघून गेले. शारदा भिलारे यांनी तातडीने ही बाब भारती विद्यापीठ पोलिसांना कळविली.
पोलिसांनी यातील गांभीर्य लक्षात घेऊन लगेज वेगवेगळी पथके तयार करून त्यांचा शोध सुरू केला. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावर केलेल्या तांत्रिक तपासात हे सर्व जण जेजुरीजवळील दोरगेवाडी, येथील डोंगरात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक अंकुश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेजुरी पोलिसांच्या मदतीने या पाच जणांना पकडले.
हे पाचही जण पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. पोलीस उपनिरीक्षक अंकुश शिंदे तपास करीत आहेत.