किरण शिंदे
पुणे: पुणेपोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड, सराईत गुन्हेगार, मोक्का कारवाईत मागील सहा महिन्यांपासून फरार असणाऱ्या गुंडाला अखेर बेड्या ठोकण्यात भारतीय विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. साकीब मेहबूब चौधरी उर्फ लतीफ बागवान (वय 23, रा. लुनिया बिल्डिंग, संतोष नगर कात्रज, पुणे) असे या सराईत गुंडाचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. साकिब चौधरी हा प्रमुख आरोपी आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. आपली ओळख बदलून तो वेगवेगळ्या जिल्ह्यात वास्तव्य करत होता. फरार असतानाही त्याचा कात्रज आणि संतोषनगर परिसरात स्वतःच्या टोळीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता.
भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकातील अधिकारी सतत त्याच्या मागावर होते. तपास पथकातील अधिकारी पोलीस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव आणि निलेश ढमढेरे यांना साकिब हा पुरंदर तालुक्यातील निरा गावात राहत असल्याची खात्री माहिती मिळाली होती. त्यानंतर तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. अधिक तपासासाठी त्याला सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान आरोपी साठी हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर मोका कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. काही काळ तो तुरुंगातही होता. मात्र जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा कात्रज भागात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी टोळी तयार केली होती. या टोळीच्या मदतीने त्याने काही गुन्हेही केले होते. आपल्या टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे यासाठी त्याने शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांचा वापर करत दहशत निर्माण केली होती.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्यासह पोलीस कर्मचारी अमोल रसाळ, सागर भोसले पोलीस अमलदार अभिजीत जाधव, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, सचिन सरपाले, आशिष गायकवाड, राहुल तांबे यांच्या पथकाने केली.